सन्माने जागा वाटप – मुख्यमंत्री

पुणे – केंद्रामध्ये पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार यावे, यासाठी राष्ट्रवादीशी आघाडी करणे गरजेचे आहे. मात्र, आघाडी करताना राजकीय ताकद पाहून सन्मानाने जागावाटप केले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कॉंग्रेसतर्फे २९-१९चा फॉर्म्युला ठेवण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

कॉंग्रेस कमिटीतर्फे धायरी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये चव्हाण बोलत होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जागावाटपाची लढाई महत्त्वाची आहे. निवडून येण्याची शक्यता पाहून तिकीटवाटप करावे लागेल. जागावाटप होताना भावनेच्या आधारे निर्णय न घेता योग्यप्रकारे चर्चा केली जावी, लोकसभा, विधानसभेचे संदर्भही विचारात घ्यावे लागतील. निवडणुकांच्या तोंडावर घडवून आणलेल्या जातीय दंगलींमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. यूपीए आघाडीसमोर जातीयवादी पक्षांचे आवाहन आहे. फॅसिस्ट वृत्तीची माणसे राजकारणाचा ताबा घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कॉंग्रेसतर्फे २९-१९चा फॉर्म्युला ठेवण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले. मागील निवडणुकीमध्ये २६-२२ असे जागावाटप करण्यात आले. मात्र, राष्ट्रवादी केवळ ८ जागी विजयी झाली, तर कॉंग्रेसने १९ जागा जिंकल्या. विधानसभेमध्येही राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. याचा विचार करून लोकसभेच्या वेळी जागावाटप होईल, ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment