हसऱ्या चेहर्‍याचे कोरियन महिलांत फॅड

आपण सुंदर दिसावे ही भावना मनात असणे गैर नाही. त्याचप्रमाणे हसतमुख व्यक्ती सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात हेही खरे. पण म्हणून चेहरा सतत हसराच दिसला पाहिजे यासाठी सर्जरी करून घेण्याची आवश्यकता कितपत असेल ? कोरियातील महिला वर्गाला सध्या या हसतमुख किंवा कायम हसर्‍या चेहर्‍याच्या वेडाने पछाडले आहे. आणि त्यासाठी भली भक्कम रक्कम खर्च करून त्या लिप लिफ्ट किवा जोकर स्माईल सर्जरी करून घेत आहेत.

यामध्ये चेहरा हसराच राहावा यासाठी ओठाचे कोपरे कायमस्वरूपी वरच उचललेले राहतात. त्यासाठी चेहर्‍याचे स्नायू अशा पद्धतीने मॅनिप्युलेट केले जातात की ज्यामुळे ओठांचे कोपरे खाली न येता कायम वरच उचललेले राहतील. अर्थात ही शस्त्रक्रिया वेदनादायी आणि धोकादायकही आहे मात्र हे ऐकतील तर त्या महिल्या कसल्या?

या संबंधात कॉस्मेटिक सर्जन सांगतात की ही शस्त्रक्रिया करताना ओठाचे कोपरे खाली आणणारे स्नायू कमजोर करून ओठाचे कोपरे वर उचलणारे स्नायू अधिक बळकट केले जातात. मात्र त्यामुळे माणूस कधी दुःखी झाला तरी त्याला रडतानाही आपल्या ओठांचे कोपरे खाली आणता येत नाहीत. कारण ही सर्जरी कायमस्वरूपी असते. अनेकदा या सर्जरीच्या खुणा चेहर्‍यावर राहतात. तसेच कांही वेळा चेहर्‍याच्या त्वचेच्या स्नायूंचे नियंत्रणही जाते व कांही वेळा चेहर्‍याची डावी व उजवी बाजू वेगळी दिसते.

कांही असले आणि कितीही दुष्परिणाम असले तरी सध्यातरी कोरियन महिला त्यासंदर्भात कांहीही ऐकून घेण्यास तयार नाहीत असेही समजते.