पर्शियन मांजरीची अंतराळ सफर

मार्चपूर्वी इराण अंतराळात सोडणार असलेल्या स्पेस कॅप्सूलमधून यावेळी पर्शियन मांजरी अंतराळात पाठविली जाणार आहे. इस्लामिक रिपब्लिकन स्पेस प्रोगाममधील वरीष्ठ संशोधकाकडून ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षात इराणने या कार्यक्रमांतर्गत माकड, उंदीर, कासव आणि किडेजंतू अंतराळात पाठविल्याचा दावा केला आहे.

इराणने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमामुळे पाश्चमात्य राष्ट्रांच्या भुवया चढल्या आहेत. त्यातच सात महिन्यांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात इराणने माकड अंतराळात पाठवून परत पृथ्वीवर सुखरूप परतल्याचे जाहीर करून माकडाचे फोटोही प्रसिद्ध केले होते. मात्र या फोटांबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यावर वरीष्ठ संशोधकांनी चुकीच्या माकडाचे फोटो नजरचुकीने प्रसिद्ध केले गेल्याचा खुलासाही केला होता. वरीष्ठ संशोधक मोहम्मद इब्राहिमी यांनी मात्र इराण ने फेब्रुवारीत २० मिनीटांसाठी माकड अंतराळात १२० किमी उंचीवर कॅप्सुलमधून नेण्यात आल्याचे व त्याला परत सुरक्षित पृथ्वीवर आणले गेल्याचा दावा केला आहे.