जगनमोहन यांच्या खटल्यात कॉंग्रेस मंत्री सहभागी

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर.कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यात आंध्र प्रदेशाचे विद्यमान मंत्री जे.गीता रेड्डी यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सीबीआयतर्फे सुरू असलेल्या या तपासात दाखल करण्यात आलेल्या दोन नव्या आरोपपत्रांमध्ये जे गीता रेड्डी यांच्या नावाचा समावेश आहे.

सध्या कारागृहात असलेले जगनमोहन रेड्डी यांच्या लेपाक्षी नॉलेज हब आणि इंड टेक झोन या दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा जे. गीता रेड्डी यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात जगनमोहन रेड्डी याचा तर समावेश आहे. पण त्याचा ऑडिटर व्ही. विजयसाई रेड्डी याचाही समावेश आहे. त्या व्यतिरिक्त जे. गीता, माजी मंत्री धर्मण्णा प्रसाद राव आणि आयएएस ऑफिसर रत्नप्रभा, एम. सॅम्युअल, बडतर्फ सरकारी अधिकारी बी.पी. आचार्य यांनाही आरोपी करण्यात आलेले आहे.

या सर्वांनी जगनमोहन रेड्डी यांच्या कंपन्यांत गुंंतवणूक करून त्यांच्या वडिलांच्या मुख्यमंत्री पदाचा अनुचित लाभ घेतला आणि सरकारी सवलती लाटल्या असा त्यांच्यावर आरोप आहे. आजपर्यंत सीबीआयने जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात आठ आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये जगनमोहन याच्याविरुध्द अमाप संपत्ती रचित केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

२००४ ते २००९ या वर्षांमध्ये हे सारे गैरव्यवहार झाले. आता जगनमोहन रेड्डी यांना अटकेत टाकण्यात आले असून गेल्या २७ मे पासून जगनमोहन रेड्डी यांना चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात कच्चा कैदी म्हणून ठेवण्यात आलेले आहे. आपली जामिनावर मुक्तता व्हावी यासाठी जगनमोहन रेड्डी यांचे प्रयत्न जारी आहेत. त्या प्रयत्नातलाच एक अर्ज उद्या सुनावणीस येत आहे.