भटकळच्या जबाबामुळे मुंबई स्फोटाला नवे वळण

नवी दिल्ली – भारतातल्या अनेकानेक बॉम्बस्फोटामुळे सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या यासीन भटकळ याच्या जबाबातून बर्‍याच नव्या गोष्टी समजू लागल्या असून यापूर्वीच्या काही बॉम्बस्फोटांच्या तपासाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा आरोपी म्हणून हिमायत बेगला शिक्षा सुनावली गेलेली आहे परंतु यासीन भटकळने आपल्या जबाबात हिमायत बेगचा या स्फोटाशी काही संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे आता जर्मन बेकरी स्फोट प्रकरणाची फेर चौकशी करावी लागणार आहे.

या प्रकरणाच्या पाठोपाठ आता २००६ सालच्या मुंबईतील लोकल गाड्यात झालेल्यात स्फोटाच्याही चौकशीला यासीन भटकळने नवी दिशा दिली आहे. पोलिसांनी या स्फोटाच्या प्रकरणात सीमी या संघटनेच्या अतिरेक्यांना अटक केली असून त्यांनी लष्करे तैय्यबाशी हातमिळवणी करून मुंबईतले हे स्फोट घडवले असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार कायदेशीर कारवाईसुध्दा सुरू आहे. परंतु यासीन भटकळने या कारवाईची दिशा चुकली असल्याचे दाखवून दिले आहे.

मुंबईतले २००६ सालचे हे स्फोट लष्करे तैय्यबा आणि सीमी यांनी घडवलेले नसून इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक कराची निवासी रियाज भटकळ याने पुरवलेल्या स्फोटकाच्या आधारे भारतातल्याच अतिरेक्यांनी घडवले असल्याचे यासीन भटकळने पोलिसांना सांगितले आहे. रियाज भटकळच्या या स्फोटाच्या योजनेची अंमलबजावणी उत्तर प्रदेशातल्या आजमगड येथील टेरर मोड्यूलचा संस्थापक सादिक इसरार शेख याने केली. अशी माहिती यासीनने दिली आहे.

पोलिसांनी आजवर ज्यांना आरोपी ठरवले ते आरोपी नसून दुसरेच आरोपी असल्याचे यासीन भटकळचे म्हणणे आहे. याचा अर्थ पोलिसांनी आजवर चुकीच्या दिशेने तपास केलेला आहे आणि मालेगाव स्फोटाच्या प्रकरणाप्रमाणेच निरपराध तरुणांना अटक केलेली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात एहतेशाम सिद्दिकी आणि अन्य बारा जणांना अटक केली आहे. मात्र एहतेशाम सिद्दिकीने अटक झाल्यापासून सातत्याने आपण निरपराध असल्याचे सांगायला सुरूवात केली आहे. त्याचे हे म्हणणे खरे असल्याचे आता यासीन भटकळच्या साक्षीतून दिसत आहे.