दिवसभरात पाणी प्यावे तरी किती?

नवी दिल्ली – पाणी हा आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमध्ये सहभागी असणारा महत्त्वाचा रासायनिक घटक आहे. परंतु एका निरोगी माणसाने २४ तासात किती पाणी प्यावे याबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. साधारणपणे आहारतज्ञ दिवसात ८ ग्लास पाणी प्यावे असे सांगत असतात आणि ही कल्पना लोकप्रिय आहे. परंतु ८ ग्लास पाणी पिणे प्रत्येकालाच फायद्याचे ठरेल असे काही सांगता येत नाही. माणसाने किती पाणी प्यावे ही गोष्ट प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बदलती राहील असे मत आहारतज्ञ वेणू आधिया हिराणी यांनी व्यक्त केली आहे.

आपण निव्वळ पाणी पित असतोच पण चहा, कॉफी, थंड पेये, सोडा आणि निरनिराळ्या प्रकारचे रसही पीत असतो. त्यांच्या माध्यमातूनसुध्दा आपल्या पोटात पाणीच जात असते. त्यांचा हिशोब केला असता दिवसभरामध्ये १२ ते १५ ग्लास आपल्या पोटात जात असतात. तेव्हा निव्वळ पाणी ८ ग्लास आणि विविध माध्यमातून ५ ते ६ ग्लास असे पाण्याचे प्राशन करावे असा सल्ला हिराणी यांनी दिला आहे.

या सल्ल्यातले ग्लास हे माप सर्वथा सारखे नसेल. कारण प्रत्येकाचा ग्लास लहान मोठा असू शकतो. तेव्हा सर्वांना लागू पडेल आणि माहीत असेल अशा मापात सांगायचे झाल्यास दिवसभरात विविध माध्यमातून अडीच लीटर पाणी पोटात गेले पाहिजे. मात्र अडीच लीटरचे हे माप निश्‍चित करताना व्यक्तीचे वय, तो करत असलेले काम आणि हवामान यांचा विचार करावा लागतो. अधिक उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पिले जाऊ शकेल. पावसाळ्यात तेवढे पाणी पिण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच किती पाणी प्यावे याचा निर्णय तारतम्याने आणि आपल्या जीवनपध्दतीचा विचार करून घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment