ज्येष्ठ व्यक्तींच्या भूमिकांमध्ये अडकून राहायचं नाही – इरफान

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता इरफान खानला ज्येष्ठ व्यक्तींचा अभिनय करण्यात जास्त रस नाही आहे. कारण अशा प्रकारच्या भूमिकांमध्ये मला अडकून राहायचे नाही, अशा प्रकराची भावना त्याने एका मुलाखतीत व्यक्त केली. याबाबत बोलताना इरफान म्हणाला की, ‘‘लाईफ ऑफ पाय’नंतर मला अनेक लोकांनी संपर्क केला आणि त्याच वयाची भूमिका करण्याचे प्रस्ताव माझ्यासमोर मांडले, परंतु मी त्या सर्वांनाच नकार दिला. कारण मला भीती वाटते की, मी अशाच प्रकारच्या भूमिका करत राहिलो तर मी त्यामध्ये अडकून राहील. यामुळे मी प्रेक्षकांना सतत काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो.’

इरफानने या आधी ‘द नेमसेक’, ‘लाईफ ऑफ पाय’ आणि आगामी चित्रपट ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटात ज्येष्ठ व्यक्तींच्या भूमिका साकारल्या आहेत. यात ऑस्कर पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक आँग ली यांच्या ‘लाईफ ऑफ पाय’मध्ये इरफाने पायसाईन मोलिटर पटेल (पाय) या व्यक्तीची भूमिका केली होती, तर ‘द नेमसेक’मध्ये त्याने पश्चिम बंगालवरून आलेल्या अशोक गांगुली या प्रवाशाची भूमिका साकारली होती.

‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाबाबत बोलताना इरफान म्हणाला की, ‘मला ‘द लंचबॉक्स’ची पटकथा आवडली. त्यामुळे मी लगेचच या चित्रपटास होकार दिला, परंतु मला या चित्रपटातील एकच गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे मी या चित्रपटात पुन्हा एकदा ज्येष्ठ व्यक्तीच्या भूमिकेत आहे. अशा प्रकारच्या भूमिका करताना आपल्याला मानसिकदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्यासुध्दा एका वयस्कर व्यक्तीसारखेच वागावे लागते आणि असे करताना खूप कष्ट घ्यावे लागतात.’‘द लंचबॉक्स’मध्ये इरफानसोबत निमरत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश बत्रा यांनी केले असून, हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.