दबावाखाली जबानी दिल्याचा श्रीसंत याचा दावा

मुंबई – आयपीएल स्पॉट फिक्सिंगमधील आरोपी क्रिकेटपटू श्रीसंत याने क्रिकेट नियामक मंडळाच्या शिस्तपालन समितीला एक पत्र पाठवले असून आपण या प्रकरणात सहभागी असल्याची पोलिसांना दिलेली कबुली दबावाखाली दिली असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी श्रीसंत याने पोलिसांसमोर दिलेल्या लेखी जबाबात आपण या स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे म्हटले होते. त्याच्या या जबाबावरूनच त्याला क्रिकेटच्या सामन्यांमधून जन्मभरासाठी बाद करण्यात आले आहे.

आता मात्र श्रीसंत याने पलटी मारली असून पोलिसांनी आपल्या नातेवाईकांना अटक करण्याची धमकी दिल्यामुळे घाबरून जाऊन आपण पोलीस सांगतील तसा जबाब लिहून दिला आपण त्यावर सही केली असे म्हटले आहे. त्यामुळे या जबाबाच्या आधारे आपल्याला देण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करावा असे त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या विरोधात स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा कसलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. असेही श्रीसंत याने नमूद केले आहे आणि ज्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे त्या सामन्याचे सर्व तपशील त्याने आपल्या निवेदनात दिले आहेत. या तपशीलांवरून आपण स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे सिध्द होत नाही असा त्याचा दावा आहे.

Leave a Comment