मोहाली -. चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. यावेळी पात्रता फेरीत चार संघ मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी एकमेकांशी झुंज देतील. मुख्य फेरीला २१ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेची फायनल सहा ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या स्पधेतील पहिल्याच सामन्यात शिखर धवनच्या हैदराबाद सनरायझर्स आणि कुमार संगकाराच्या श्रीलंकेचा संघ कंडुराता मॅरुन्समध्ये सामना होईल.
चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचा थरार आजपासून
पात्रता फेरीची सुरुवात दुपारी चार वाजता पाकिस्तानचा फैसलाबाद वुल्व्हज आणि न्यूझीलंडचा की ओटागो यांच्यातील लढतीने होईल. यानंतर रात्री ८ वाजता हैदराबाद सनरायझर्स आणि श्रीलंकेचा संघ कंडुराता मॅरुन्स समोरासमोर असतील. फैसलाबाद वुल्व्हज आणि ओटागो सामन्यात पाकचा मिसबाह-उल-हक आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्लुम आकर्षण केंद्र असतील. मिसबाह फैसलाबादचे नेतृत्व करेल. त्याच्या संघात फिरकीपटू सईद अजमल, असद अली, मोहंमद सलमानसारखे आंतरराष्ट्री य खेळाडू आहेत.
ओटागो संघाचे नेतृत्व डॅरेक डी बुर्डर करणार आहे. संघाकडे ब्रेंडन मॅक्लुम, रेयान टेन डोश्चेट, अरोन रेडमंड, हामिश रुदरफोर्ड, इयान बटलरसारखे आंतरराष्ट्री य खेळाडू आहेत. यामुळे हे दोन्ही संघ तुल्यबळ असून सामना रोमांचक होईल.
या फेरीत भारताचा एकमेव संघ सनरायझर्स हैदराबाद आहे. हैदराबादचे नेतृत्व टीम इंडियाचा युवा खेळाडू शिखर धवन करणार आहे. तो संघाचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज आहे. अर्थात त्याच्यावर दुहेरी जबाबदारी असेल. कर्णधारपद भूषवताना फलंदाज म्हणून चांगली कामगिरीही त्याला करावी लागेल. त्याच्याशिवाय हैदराबादच्या संघात फिरकीपटू अमित मिश्रा, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, पार्थिव पटेलसारखे भारतीय खेळाडू आहेत.