अडवाणी आले वाटेवर

भारतीय जनता पार्टी असो की अन्य कोणता पक्ष असो त्यात सत्ता संघर्ष हा असणारच. त्यातच आता पंतप्रधानपदाची शक्यता निर्माण झालेली. अशा स्थितीत एकदा उपपंतप्रधान म्हणून काम केलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी ते पद खुणवायला लागले असल्यास नवल ते काय ? त्यातूनच भाजपात मोदी यांना अडवाणींचा विरोध सुरू झाला होता. अडवाणी यांनी काही वेळा गप्प बसून, काही वेळा एखादे सूचक विधान करून तर कधी अन्य नेत्यांची नावे अन्य प्रकारांनी पुढे करून त्यांनी मोदींच्या वाटचालीत अडथळे आणायला सुरूवात केली होती पण काल त्यांनी आपली ही सारी शस्त्रे म्यान केली आणि मोदींची स्तुती करून आपला त्यांना असलेला विरोध संपला असल्याचे जणू जाहीरच केले. मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असता कामा नयेत किंवा संधी मिळालीच तर पंतप्रधान असता कामा नयेत असे मानणारा एक वर्ग भाजपात आहे. या वर्गात प्रामुख्याने सुषमा स्वराज, अरुण जेटली, अनंतकुमार आणि नितीन गडकरी हे प्रामुख्याने आहेत. पण त्यांच्या या विरोधाला अडवाणी यांच्यासारख्या बुुजुर्ग नेत्याचा आधार होता म्हणून पक्षातला हा गट उठून दिसत होताच पण मोदी यांच्यावरून पक्षात फूट असल्याचे दृष्य दिसत होते. पण आता अडवाणी यांनीच शरणागती स्वीकारली आहे.

मोदी यांच्याऐवजी अडवाणी हे पंतप्रधान होण्यास अधिक पात्र आहेत असा या गटाचा दावा होता. पण संघाला हे मान्य नव्हते. कारण अडवाणी यांचे वय तर झाले आहेच पण अडवाणी भारतातल्या जनतेला आकृष्ट करू शकत नाहीत हे त्यांनी २००९ च्या निवडणुकीत दाखवून दिले ंआहे. त्यांच्याकडे मोदी यांच्यासारखे करिष्माई नेतृत्व नाही हे एकदा सिद्ध झाले आहे. असे असताना कोणताही पक्ष अडवाणी यांचा प्रयोग दुसर्‍यांदा करणार नाही. कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी अडवाणी यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा अनादर होत असल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांना आणि नितीशकुमार यांनाही आलेला उमाळा अडवाणी यांच्या प्रेमापोटी किती आहे आणि मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेच्या असूयेपोटी किती आहे हे लहान पोरालाही कळू शकते. दिग्विजयसिंग यांना अडवाणी यांचा शहाणपणाचा सल्ला फार मोलाचा वाटत असेल तर त्यांनी सोनिया गांधी यांना अडवाणी यांचा अनमोल सल्ला अवश्य मिळवून द्यावा. निदान त्यांच्या पक्षाच्या बुडत्या जहाजाला थोडा तरी दिलासा मिळेल पण आज भाजपाला अडवाणी यांच्या अनमोल सल्ल्याची गरज नाही कारण त्यांनी गेल्या काही दिवसात आपण पक्षाची जनमानसात कोणती प्रतिमा निर्माण करीत आहोत याचे भान ठेवलेले नाही.

वैयक्तिक जीवनात वानप्रस्थाश्रम असतो. कोणत्याही सासूला आपल्या कडोसरीच्या चाव्या सुनेच्या ताब्यात देऊन देव देव करावे लागते. हा निसर्गाचा नियम आहे. तों घराघरात सिद्ध झाला आहे पण अडवाणी यांना पंतप्रधान होण्याचे वेध लागले होते आणि बाकीचे त्यांचे सहकारीही अडवाणींचे निशाण खांद्यावर घेऊन उगाच नाचत होते. अडवाणी यांच्या आपल्या पंतप्रधानपदाच्या कल्पना किती चुकीच्या आहेत हे त्यांना कळत नव्हते असे नाही. गेल्या दोन वर्षांपासून संघाच्या नेत्यांनीही त्यांन त्याची जाणीव दिली होती. आज भारतातल्या सर्वसामान्य माणसाच्या आकषर्र्णाचा विषय ठरू शके ल असे नेतृत्वच भाजपात उपलब्ध नसते तर अडवाणी यांच्याशिवाय पर्याय राहिला नसता. २००९ साली असाच प्रसंग होता पण आता मोदी यांनी हे पोकळी नक्कीच भरून काढली आहे. असे असतानाही अडवाणी नव्या पिढीची वाट अडवूनच ठेवणार असतील तर त्यांना ते जमणारही नाही आणि त्यात त्यांचे हसे होईल. उद्या चालून आपल्याला घटक पक्षांचा पाठींबा मिळेल आणि तो मोदी यांनी मिळण्याचे शक्यता नाही या एका आधारावर अडवाणी आपल्या उमेदवारीचे घोडे पुढे दामटत होते पण मुळात घटक पक्षांचा पाठींबा घेऊन सत्तेवर दावा सांगण्याइतपत जागा तर मिळाल्या पाहिजेत ना ?
तेवढी क्षमता अडवाणी यांच्यात नाही.

छत्तीसगडमध्ये कोरबा येथे एका वीज प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अडवाणी यांनी मोदींवर प्रशंसेचा वर्षाव केला. त्यांचा विरोध या प्रशंसेने संपलाय असे समजायला हरकत नाही. दोन वर्षापूर्वीपासून तो सुरू होता. गुजरात दंगलीच्या एका प्रकरणात नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट मिळाली तेव्हा त्यांनी अहमदाबादमध्ये आत्मक्लेष उपोषणाचे नाटक केले आणि सगळ्या देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यांच्या उपोषणाला लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी भेटी दिल्या. मात्र अडवाणी आणि सुषमा स्वराज वगळता अन्य सर्वांनी त्याचवेळी नरेंद्र मोदी यांना भावी पंतप्रधान म्हणून घोषित केले. या संबंधात अडवाणी यांनी बाळगलेले मौन तेव्हापासून महत्त्वाचे ठरलेले होते. त्यांच्या मौनातून व्यक्त झालेला विरोध नंतरच्या काळात म्हणजे कालपर्यंत कायम होता. नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राम जेठमलानी यांच्या मध्यस्थीने लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांनी केलेले नम्रतेचे नाटक अडवाणी यांच्या निर्धाराला धक्का देऊन गेलेले असावे.

Leave a Comment