वेगळेपणा असेल तरच नवी भूमिका स्वीकारतो:दिलीप प्रभावळकर

पुणे, – एकदा केलेली भूमिका पुन्हा करायला मजा येत नाही. त्यामुळे भूमिकेमध्ये वेगळेपणा शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. भूमिकेत वेगळेपण असल्यास मी ती लगेच स्वीकारतो. तशाच प्रकारचा वेगळेपणा नारबाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे तो चित्रपट मी स्वीकारला. या चित्रपटात काम करताना एक वेगळीच मजा आली, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले.

केसरी गणेशोत्सवात ‘जिवा लावी गोडी, नारबाची वाडीम या चित्रपटातील कलाकारांची मुलाखत राजेश दामले यांनी घेतली. त्या वेळी प्रभावळकर बोलत होते. अभिनेते मनोज जोशी, समीर जोशी, अभिनेत्री ज्योती मालशे, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्याशी संवाद साधण्यात आला. प्रभावळकर म्हणाले, ‘चित्रपटामध्ये मी भूमिका केलेला नारबा हा खट्याळ व इरसाल आहे. तो एक अस्सल कोकणी माणूस आहे. त्याचे वाडीवर प्रेम आहे. वाडीला टिकविण्यासाठी तो चिवटपणाने प्रयत्न करीत असतो. एका कोकणी माणसाची भूमिका करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अभिनेत्याला वेगळ्या भूमिकेचा वास येत असतो. तो आल्यावर तो ती भूमिका स्वीकारतो. तसेच माझ्याही बाबतीत झाले आहे.

ज्योती मालशे म्हणाल्या, की मूळची कोकणातील असल्याने कोकणी भूमिका साकारणे माझ्यासाठी नवीन नव्हते. पण भूमिकेसाठी मेहनत घ्यावीच लागली. दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी या दोन कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणे माझे भाग्यच. या चित्रपटामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. आदित्य सरपोतदार म्हणाले, नारबा आणि वाडी या दोन गोष्टींभोवतीच हा चित्रपट फिरतो. यात कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांना नक्कीच भावणारे आहे.

समीर जोशी म्हणाले, की चित्रपट कथा, कलाकार उत्तम असून चालत नाही, तर त्याचे मार्केटिंग उत्तम दर्जाचे होणे गरजेचे आहे. त्याशिवाय मराठी चित्रपट उत्तमरीत्या चालू शकत नाहीत. टीव्ही अथवा डीव्हीडीवर चित्रपट न पाहता चित्रपटगृहात जाऊन पाहिल्यास मराठी चित्रपटांना आणखी चांगले दिवसही येतील.