पोलिसांचे जीवघेणे ताण

पोलिसांच्या आत्महत्येच्या आणि त्यांच्यातल्या हिंसाचारी वृत्तीशी संबंधित बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. पण राज्यातला सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी आत्महत्या करीत असेल तर ती बाब सर्वांसाठीच धक्कादायक असेल. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रणजित कुमार सहाय यांनी तसा प्रयत्न केला आहे आणि हे ५२ वर्षांचे गृहस्थ ६० टक्के भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात मृत्यूशी झुुंज देत आहेत. त्यांना आत्महत्या करावीशी वाटली म्हणजे ते मानसिकदृष्ट्या ठीक नव्हते. अशा अधिकार्‍याला राज्याच्या पोलीस दलात एवढ्या मोठ्या पदावर बसवले जाते पण त्याने मानसिक तोल ढळल्याच्या अवस्थेत आपल्या कमरेला लटकलेले पिस्तूल नको त्याच्यावर झाडले तर काय करणार ? मनाने एवढा अस्थिर असलेला माणूस राज्यातल्या पोलीस दलात एवढ्या मोठ्या पदावर नियुक्तच कसा केला जातो ? सामान्य माणसांच्या आत्महत्या टळाव्यात यासाठी पोलीस काम करीत आहेत. त्यासाठी स्वतंत्र हेल्प लाईन विकसित करण्यात आली आहे. मानसिकदृष्ट्या अस्थिर असणार्‍या माणसाला आत्महत्या करावीशी वाटली तर त्याने या हेल्प लाईनशी संपर्क साधावा म्हणजे तिच्यावरून त्याचे समुपदेशन केले जाईल आणि त्याची आत्महत्या टळेल असे पोलिसांचे सांगणे असते.

मग एवढ्या मोठ्या पोलीस अधिकार्‍याला या हेल्प लाईनची काही माहिती कशी नव्हती ? या पदावर काम करणार्‍या अधिकार्‍यांना असे कोणते तणाव असतात याचा अभ्यास केला गेला पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या मनावरील तणाव कमी करणारे अनेक उपक्रम आणि नित्याचे समुपदेशन सुरू आहे. एसटी महामंडळाच्या एका मनोरुग्ण वाहकाने वेड्यासारखी बस चालवून पुण्यात ९ जणांचे बळी घेतले. अशा वाहकाच्या हातात बसचे स्टिअरिंग देणे किती धोक्याचे आहे हे तेव्हा समजले. पण त्याच चालीवर आपण असेही म्हणू शकतो की, मनोरुग्ण अधिकारी राज्यात कायदा सुव्यवस्था सांभाळणार्‍या यंत्रणेच्या सर्वोच्च पदावर कसा राहू शकतो ? श्री. सहाय यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तो आपल्या घरी केला. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्यांचा जबाब लिहून घेण्यात आलेला नाही. त्यामुळेही अनेक संशयाना जागा मिळाली आहे. एवढा मोठा अधिकारी आत्महत्येचा प्रयत्न करतो याचा अर्थ त्यामागे तेवढाच मोठा तणाव असणार आणि तो संवेदनशील असणार यात काही शंका नाही. म्हणूनच त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचा जबाब घेतला जाणार आहे.

त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी कसलीही चिठ्ठी लिहून ठेवली नाही. त्यांनी आपले काम करताना अनेकदा असा पेच अनुभवला असणारच. पण आता त्यांनीच तो निर्माण करून ठेवला. त्यांचा तणाव पोलीस दलाशीच संबंधित असणार. निदान आत्महत्येचे कारण त्यांच्या तोंडून समजेपर्यंत या बाबत केवळ अंदाज करणेच आपल्या हातात आहे. आता पोलीस दलात आणि गृह खात्यात भ्रष्टाचार फार माजला आहे. पोलिसांच्या बदल्या कोणी कराव्यात यावरून गृह खात्यात गृह युद्ध सुरू आहे. ते एवढे उघड उघड सुरू रहाते याचा अर्थ काय होतो ? बदल्या हे कुरण झाले आहे. अशा खात्याच्या वरच्या स्तरावर किती देवाण घेवाण होत असेल याचा अंदाज आपण करू शकतो. सहाय हे एस.टी. महामंडळात होते. तिथे ते दीपक कपूर या त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आय.ए.एस. अधिकार्‍याच्या हाताखाली दुय्यम अधिकारी म्हणून काम करीत होते. त्यावरून संघर्ष होता. केवळ ज्येष्ठतेचेच भांडण होते असे नाही तर आयएएस विरुद्ध आयपीएस असाही संघर्ष होता. त्यातून अनेकदा खटके उडत असत. शिवाय दीपक कपूर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सहाय यांच्याकडे होती. शेवटी सहाय यांची बदली पोलीस दलात आणि दीपक कपूर यांची बदली अन्यत्र करण्यात आली. मात्र या कारणावरून एवढा मोठा पोलीस अधिकारी आत्महत्या करील असे काही वाटत नाही.

कामाचा ताण हे पोलिसांच्या बाबतीतील आत्महत्येचे नेहमीचेच कारण आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका पोलीस निरीक्षकाने कामाचा तणाव असह्य झाल्याने डोक्यात गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. गेल्या वर्षी ठाण्यात एका सहायक पोलीस आयुक्तांनी एका हॉटेलात आपल्या पत्नीच्या सोबत भोजन करीत असतानाच तिथेच गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. या मागची कारणे काही समजली नाहीत पण त्या आयुक्ताची चौकशी सुरू होती आणि आठ महिने त्याला पगार मिळाला नव्हता. त्यामुळे त्याने आपले जीवन संपवले असावे असे मानले गेले पण अजून तरी त्याच्या आत्महत्येचे खरे कारण समजलेले नाही. कामाचा ताण हे कारण आहेच. पण पोलीस दलातला भ्रष्टाचार, त्यात एकमेकांना गुंतवणे, चौकश्या आणि नको असताना या जाळ्यात गुंतावे लागणे हीही काही कारणे संभवतात. कारण पोलीस दलाच्या वरच्या स्तरावर मोठ्या भ्रश्टाचाराच्या कथा सांगितल्या जात असतात. अशा वातावरणात एखाद्या प्रामाणिक अधिकार्‍याची गोची होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा अधिकारीही आत्महत्येचा मार्ग अवलंबू शकतो.