सुश्मिता बॅनर्जी गुप्तहेर असल्याचा संशय

काबुल – बंगाली लेखिका सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या आपणच केली असल्याची कबुली तालिबान संघटनेच्या आत्मघातकी पथकाने दिली आहे. बॅनर्जी ह्या भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा संशय होता. म्हणून आपण त्यांची हत्या केली. असे या आत्मघातकी पथकाच्या प्रमुखाने त्यांच्या संघटनेच्या डेली बिस्ट या ऑनलाईन पत्रकात ही कबुली दिली आहे. या प्रमुखाच्यावतीने संघटनेचा प्रवक्ता क्वारी हमजा याने हा मजकूर प्रसिध्द केला आहे.

सुश्मिता बॅनर्जी यांनी जांबाज खान या अफगाण उद्योगपतीशी विवाह केला होता आणि ४९ वर्षीय सुश्मिता या काही काळ बंगालमध्ये राहून नुकत्याच पुन्हा एकदा अफगाणिस्तानात गेल्या होत्या. काबुलमध्ये तालिबान्यांनी त्यांना पळवून नेले आणि त्यांची हत्या केली. मात्र या घटनेचे तपशील देताना तालिबान संघटनेने, पळवून नेल्यानंतर त्यांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांची हत्या करण्यात आली आहे असे या पत्रकात म्हटले आहे.

सुश्मिता बॅनर्जी ह्या भारतासाठी हेरगिरी करत होत्या आणि त्यांच्या हेरगिरीच्या कामात अन्यही काही लोक सहभागी होते. त्यांची नावे सुश्मिता बॅनर्जी यांनी त्यांच्या तपासात सांगितले असल्याचेही तालिबान संघटनेने नमूद केले आहे. दरम्यान सुश्मिता बॅनर्जी यांच्या माहेरच्या लोकांनी मात्र तिच्या हत्येमागे मोठा कट असल्याचा आणि त्या कटात त्यांचा पती जांबाज खान याचाही हात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करण्यात यावी अशीही मागणी बॅनर्जी कुटुंबांनी केली आहे.