‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

ओडिशा- भारताने ‘अग्नि-५’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे रविवारी सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी दुस-यांदा व्हीलर आयर्लंड येथून यशस्वी प्रक्षेपण केले. ‘अग्नि-५’ या क्षेपणास्त्रा ची पाच हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे. यामुळे आगामी काळात संपूर्ण आशिया, युरोप आणि चीनला आता काही क्षणातच ‘लक्ष्य’ करता येणार असल्याचे डीआरडीओच्या अधिका-यांनी सांगितले.

‘अग्नि-५’ मधून एकाचवेळी एक हजार किलो अणुशस्त्र बाहून नेण्याची क्षमता असून पाच हजार किलोमीटर किंवा तीन हजार १०० मैल अंतरावर लक्ष्यभेद साधता येणार आहे.‘अग्नि-५’च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत आता अशाप्रकारची क्षेपणास्त्र असलेल्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनच्या रांगेत जावून बसला आहे.

वजनाने ५० टनाच्या ‘अग्नि-५’ची लांबी १७.५ मीटर आहे. ‘अग्नि-५’ची निर्मिती १९८३ पासून सुरु होती. ‘अग्नि-५’ची यापूर्वी १९ एप्रिल २०१२मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. ‘अग्नि-५’चे भारतीय सैन्य दलात २०१७ पर्यंत समावेश होईल, असे डीआरडीओच्या एका अधिका-याने सांगितले. मात्र त्यापूर्वी आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत.