येडीयुरप्पा यांना भाजपात येण्याचे वेध

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर होताच कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी आपला कर्नाटक जनता पक्ष हा भाजपा प्रणित एनडीए आघाडीचा घटक असेल असे जाहीर केले. आपण मोदी यांना पाठिंबा देऊ कारण मतदारांना गतिमान विकास करणारा भारत देश हवा आहे आणि मोदी देशाला गतिमान करू शकतात असे येडीयुरप्पा म्हणाले. त्यांनी आपली ही प्रतिक्रिया ट्विटरवरून जाहीर केली आहे.

आपण पुन्हा भारतीय जनता पार्टीत येणार का या विषयी त्यांनी फार स्पष्टपणे काही म्हटले नसले तरी आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी येत्या १८ तारखेला बैठक होणार असून त्या बैठकीत यावर विचार केला जाणार आहे असे सूचित केले आहे. आपल्या पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचे स्वागत केले असल्याचे येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे.

येडीयुरप्पा हे भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकातले पहिले मुख्यमंत्री होते. परंतु भ्रष्टाचाराच्या कारणावरून त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षाने तसा आग्रह धरल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पद सोडले पण त्यासोबत पक्षही सोडला आणि कर्नाटक जनता पक्ष हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. त्यांच्या या पक्षाला कर्नाटकाच्या गतवर्षी झालेल्या निवडणुुकीत फारसे यश मिळविता आले नाही. त्यामुळे भ्रमनिरास झाला आणि आता त्यांना भारतीय जनता पार्टीत पुन्हा येण्याचे वेध लागले आहेत.

भारतीय जनता पार्टीतून आजवर कल्याणसिंग (उत्तर प्रदेश), उमा भारती आदी अनेक नेते रागावून, रुसून बाहेर पडले. त्याचप्रमाणे येडीयुरप्पा यांनीही पक्ष सोडला. परंतु कल्याणसिंग आणि उमा भारती हे फार दिवस बाहेर राहू शकले नाहीत. ते पक्षात परत आले. तशीच येडीयुरप्पा यांचीही वाटचाल सुरू आहे असे दिसून आले आहे.