मोदींच्या नावाची अधिकृत घोषणा

नवी दिल्ली- अखेर भारतीय जनता पक्षाने लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध डावलून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. राजधानी दिल्लीत भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सांगितले.

एनडीएफमधील पक्षांनी मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा असे सिंह यांनी सांगितले. या घोषणेनंतर मोदींनी पक्षातील सर्व नेत्यांचे आभार मानले. आपल्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली असून 2014च्या लोकसभा निवडणूकीत पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये बैठका सुरु आहेत. मोदींच्या नावाला पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी विरोध केला होता. राजनाथ सिंह यांनी तीन दिवसांपासून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अडवाणी यांनी आपला विरोध कायम ठेवला होता.

दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या संसदीय सदस्यांच्या बैठकीत अडवाणी यांच्या अनुपस्थितीतच मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, मुरली मनोहर जोशी आदी नेते उपस्थित होते.

Leave a Comment