मनोरुग्णालयाच्या आगीत ३७ मृत्यूमुखी

ल्युका (रशिया) – रशियाची राजधानी मॉस्कोच्या जवळ असलेल्या ल्युका या शहराजवळच्या वेड्याच्या इस्पितळाला अचानकपणे आग लागून त्यात ३७ मनोरुग्ण मरण पावले. या मनोरुग्णालयाची इमारत फार जुनी असून तिच्या बांधकामात लाकडाचा वापर भरपूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही इमारत ज्वालाग्राही बनली आहे. संबंधित नगरपालिकेने या इमारतीच्या मालकांना इमारतीची दुरूस्ती करण्याविषयी वारंवार सांगितले होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारतीला आग लागताच ती काही तासात भस्मसात झाली आणि या रुग्णालयामध्ये दाखल अ असलेल्या ६० रुग्णांपैकी ३७ जण मरण पावले.

ही आग मध्यरात्री नंतर पावणे तीन वाजता लागली. एका वेड्याने गादीवर झोपून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गादीही पेटली आणि तिने आसपासच्या खाटांवरील गाद्यांनाही आगीच्या ज्वाळात ओढून घेतले. त्यामुळे बघता बघता इमारतच पेटली. एका परिचारिकेने रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नात ती स्वतः जळून मरण पावली.

गेल्या एप्रिल महिन्यामध्ये याच प्रदेशातील अन्य एका वेड्याच्या इस्पितळाला अशीच लाग लागून ४८ रुग्ण मरण पावले होते. हे सगळे रुग्ण झोपलेले असतानाच इमारतीने पेट घेतला त्यामुळे त्यांना स्वतःचा जीव वाचवता आला नाही. काल पुन्हा एकदा याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. आता रशियातल्या सरकारने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.