जयपूरच्या दिव्या कुमारी भाजपात

जयपूर – राजस्थानातील जयपूर राजघराण्याच्या राजकन्या दिव्या कुमारी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. दिव्या कुमारी यांचे वडील लष्करात होते आणि त्यांनी काही काळ कॉंग्रेसमध्ये काम केले होते. कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूकही लढविली होती. परंतु त्यांचा पराभव झाला. दिव्या कुमारी यांच्या आजी महाराणी गायत्री देवी यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. १९७५ साली देशात जाहीर झालेल्या आणीबाणीमध्ये इंदिरा गांधी यांनी सुडाच्या भावनेने या राज घराण्याला बराच त्रास दिलेला होता. त्यामुळे एरवी राजकारणापासून दूर राहणारे हे घराणे राजकारणात ओढले गेले.

या राजघराण्यातली तिसरी पिढी दिव्या कुमारी यांच्या रुपाने राजकारणात आली आहे. दिव्या कुमारी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल असे वाटल्यामुळे आपण भाजपात आलो आहोत असे त्या म्हणाल्या. १९८५ साली राजीव गांधी यांचा राजकारणात उदय झाला तेव्हा अनेक तरुणांना ते देशाचा विकास करतील अशी खात्री वाटली म्हणून अनेक तरुण राजीव गांधी यांच्या पाठिशी उभे राहिले. तीच अवस्था आज नरेंद्र मोदी यांची आहे.

भारतातली जनता कॉंग्रेसच्या कारभाराला, भ्रष्टाचाराला, नाकर्तेपणाला कंटाळली आहे. हा पक्ष देशाचा विकास करू शकणार नाही असे लोकांना वाटत आहे. भारतीय जनता पार्टीला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवले जात असले तरी हाच खरा सेक्युलर पक्ष आहे. असेही दिव्या कुमारी यांनी सांगितले.