थोडी वाट पहा सत्य बाहेर येईलच-कलमाडी

पुणे -माझ्यावर आरोपाचे जे वादळ आहे, त्यातील तथ्य एकदोन महिन्यात स्पष्ट होईल पण पुण्याचा लौकिक कमी होईल असे काही करणार नाही हे कृपया लक्षात घ्या आणि थोडी वाट पहा, असे सांगत काँग्रेसचे निलंबीत खासदार सुरेश कलमाडी यांनी कमबॅक करण्याचे सूतोवाच केले. दरम्यान, बॉलीवूड स्टार्स, राजकीय नेते, विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सवी पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. कलमाडी म्हणाले की, कोणताही महोत्सव सुरू करणे सोपे असते. मात्र पंचवीस वर्षे तो यशस्वीपणे चालविणे अत्यंत अवघड आहे. यापूर्वीही अनेक उत्सव सुरु करण्यात आले मात्र ते चालू राहू शकले नाहीत. पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठीच हा महोत्सव सुरू करण्यात आला. त्यानंतर फिल्म फेस्टिव्हल, पुणे मॅरेथॉन याद्वारे पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले. युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही देशाची कामगिरी उंचावली होती. या सर्वांमुळे शहराचा लौकिक वाढत आहे. शहराच्या लौकिक कमी होईल, असे मी करणार नाही. येत्या दोन-तीन महिन्यात ते स्पष्ट होईल. खासदार म्हणूनही मी जवारहलाल नेहरू नागरी पुर्ननिर्माण योजनेअंतर्गत विशेष निधी खेचून आणला आहे. त्याद्वारे शहराचा विकास करण्यात येईल.

फेस्टिव्हलचे रंगारंग कार्यक्रमांनी फेस्टिव्हलचे उद्घाटनहेमामालिनी यांची गणेशवंदना, लेझर शो, शिवराज्याभिषेकचा प्रसंग, राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारे नृत्य, बॉलीवूडचे स्टार्सची उपस्थिती अशा विविध कार्यक्रमांनी पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन समारंभ रंगला. राज्याचे बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार उदयनराजे भोसले, महाराष्ट्र बँकेचे चेअरमन नरेंद्र सिंग, उद्योजक राहुल बजाज, सयोजक कृष्णकांत कुदळे, उपमहापौर बंडू गायकवाड यावेळी उपस्थित होते. तर हेमा मालिनी, ईशा देओल, सुनील शेटट्टी, कंगना राणावत, डिंपल कपाडिया, समीरा रेड्डी अशा बॉलीवूड स्टार्सची उपस्थिती या कार्यक्रमासाठी राहिली. यावेळी कर्नाटक शास्त्रीय संगीताचे गायक डॉ. एम. बालमुरली कृष्ण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक नरेंद्र सिंग, बैलगाडा शर्यतीचे ज्येष्ठ संयोजक ज्ञानोबा लांडगे, आर्य प्रसारक मंडळाचे श्रीनिवास जोशी यांना पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे प्रतापराव उर्म तात्या गोडसे यांच्या स्मृतीनिमित्तचा जय गणेश पुरस्कार श्रीपाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास देण्यात आला.