नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण आणि आग्नेय विभागामध्ये मोडणार्या ११ देशात २५ कोटी लोक तंबाखू खातात. जगभरातल्या तंबाखू खाणार्यांपैकी ही संख्या ९० टक्के आहे. त्यावरून या भागात होणारा तंबाखूचा वापर किती मोठा आहे याचा अंदाज येतो. भारताचा समावेश याच विभागात होतो आणि जगभरात तंबाखू खाणार्या लोकांपैकी ३२ टक्के पुरुष आणि १८ टक्के स्त्रिया एकट्या भारतात आहेत.
भारतात तंबाखू खाणार्या लोकांमुळे दरसाल ३८ कोटी ९० लाख डॉलर्स (२ हजार ४०० कोटी रुपये) एवढे आर्थिक नुकसान होते. हे सारे आकडे २००४ सालचे आहेत. त्यावर्षी तंबाखू खाऊन आजारी पडणार्या लोकांच्या वैद्यकीय उपचारांवर देशाला दरवर्षी जवळपास १५०० कोटी रुपये एवढा खर्च येत होता. तो आता किमान दुप्पट वाढला आहे. तंबाखू खाण्याने होणारे इतरांचे नुकसान तर त्यापासून वेगळेच आहे. मात्र एवढे नुकसान होऊनसुध्दा तंबाखूची सवय कमी होत नाही.
तंबाखूचा हा वापर सिगारेट आणि विडी शिवायचा आहे. त्यामध्ये जर्दा, तपकिर, तंबाखू, गुटखा यांचा समावेश होतो. तंबाखू खाण्याचे भारतातले प्रमाण जगात सर्वाधिक आहे आणि तंबाखू खाऊन कर्करोग होणार्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. कर्करोग होऊन मरणार्यांपैकी ९० टक्के बळी हे तंबाखू खाणार्यांचे असतात.