नवी दिल्ली – केवळ देशाचेच नव्हे तर जगभराचे लक्ष वेधून घेतलेल्या दिल्ली येथील गॅगरेप प्रकरणाचा निकाल आज जलदगती सत्र न्यायालयाने जाहीर केला असून चौघाही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांनी चौघाही आरोपींनी केलेले कृत्य मानवतेला काळिमा लावणारे असून ही केस दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे व आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली जात असल्याचे जाहीर केल्यानंतर न्यायालयाबाहेर जमलेल्या जनसमुदायाने आनंद व्यक्त केला.
मुकेशसिंग वय २६, अक्षय ठाकूर वय २८, पवन गुप्ता वय १९ आणि विनय शर्मा वय २० अशी आरोपींची नांवे आहेत. फाशी ऐकताच विनय शर्मा याला अश्रू अनावर झाले तर आरोपीच्या वकीलांनी हा निकाल जनता व राजकीय दबावाखाली दिला गेल्याचे सांगून उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. अगदी शेवटी राष्ट्रपतींच्याकडे दयेचा अर्ज करेपर्यंत ही केस लढविली जाणार असल्याचे वकीलांनी सांगितले. सहा आरोपींपैकी प्रमुख आरोपीने मार्च मध्येच तिहार तुरूंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तर पाचवा आरोपी अज्ञान ठरल्याने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे.
या गुन्ह्यात बळी पडलेल्या तरूणीच्या कुटुंबियांनी प्रथमपासूनच फाशीची मागणी लावून धरली होती. न्यायालयाच्या निकालाबाबत समाधान व्यक्त करताना त्यांनी आम्हाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली तर दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी फाशी सुनावल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
१६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री दहाच्या सुमारास संबंधित तरूणी मित्रासमवेत सिनेमा पाहून बाहेर पडल्यानंतर बस मध्ये चढली होती. मात्र बसमध्ये असलेल्या सहा जणांनी तिच्या मित्राला गजाने मारहाण करून लुटले तेव्हा ती मध्ये पडली. त्यावेळी सहा जणांनी तिच्यावरही हल्ला करून सामुहिक बलात्कार केला आणि नंतर दोघांनाही बसमधून बाहेर फेकले होते. त्यानंतर बेशुद्धावस्थेत या दोघांना रूग्णालयात दाखल केले गेले. सिंगापूर येथे संबंधित तरूणीवर उपचार सुरू असताना दोन आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जनमानसात क्षोभ निर्माण होऊन देशभर जनतेने रस्त्यावर उतरून निदर्शन कली होती आणि बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत व लैगिक गुन्ह्यांसाठी कडक कायदा करावा अशी मागणी सातत्याने केली गेली होती.