शोपियान शहरात संचारबंदी

श्रीनगर – काश्मीर खोर्‍यातल्या शोपियान शहरात राखीव पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे चिडलेल्या लोकांनी हिंसाचारास सुरूवात केल्यामुळे या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. केन्द्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकार्‍यांनी मात्र गोळ्ीबार केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. गागाराम कँप भागात जवानांनी लोकांना कसलीही पूर्वसूचना ने देता गोळीबार केला. त्यात महंमद रफी राथेड हा २८ वर्षांचा बस ड्रायव्हर ठार झाला तर एका महिलेसह दोघे जखमी झाले असा लोकांचा दावा आहे.

केन्द्रिय राखीव पोलीस दलाच्या अधिकार्‍यांनी या गोळीबाराचा इन्कार केला आहेच पण या भागात आपल्या दलाचे जवान तैनातही करण्यात आलेले नाहीत असे स्पष्ट केले आहे. मात्र राज्याच्या पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. या पूर्वी गेल्या शनिवारी याच शहराच्या परिसरात एका गोळ्ीबाराच्या घटनेत चौघांचा बळी गेला आहे. याही प्रकाराची चौकशी राज्य पोलिस करीत आहेत असेही त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले.

शनिवारच्या घटनेत ठार झालेले तिघे अतिरेकी होते असे राखीव दलाचे म्हणणे आहे पण तिथले नागरिक या म्हणण्याशी सहमत नाहीत. या तिघांच्याच काय पण चौघांच्याही नावावर एखादा साधा गुन्हाही नोंदलेला नाही. ते अतीशय सामान्य नागरिक होते. काही लोकांनी यातला चौथा माणूस हा मात्र अतिरेकी होता हे मान्य केले आहे. या घटनांच्या निषेधार्थ विभाजनवादी संघटनांनी मात्र काश्मीरच्या किश्तवार, डोडा आणि रामबन या जिल्ह्यात बंद पाळण्याचा आदेेश दिला आहे.