पेट्रोल स्वस्त होणार

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाचे भाव घसरल्याने व डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर झाल्याने पुढील आठवडयात पेट्रोलच्या भावामध्ये एक ते 1.50 रुपयांने घट होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी घरगुती गॅस आणि डिझेलच्या दरात एकाचवेळी वाढ होण्याची संकेत पेट्रोलिमय मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.  डिझेल आणि घरगुती गॅसच्या भावामध्ये वाढ करणे हे राजकीय आणि आर्थिकदृष्टयाफ जिकिरीचे आहे. या भाववाढीचा काही भार हा जनतेला सोसावा लागणार असल्याने हे सरकारसाठी मोठे आव्हान आहे. परंतु या भाववाढीपासून आपण लांब पळू शकत नसल्याचे पेट्रोलिमय सचिव विवेक रे यांनी दिल्ली प्रोडक्टीव्ह कौंसिलतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. सीरियातील कमी झालेला तणाव व स्थिर झालेला रुपया यामुळे कच्चा तेलाच्या किमती खाली उतरल्या आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोलच्या भावावर होऊन पेट्रोलचे भाव येत्या 15 ते 16 सप्टेंबपर्यंत कमी होण्याची शक्यता विवेक रे यांनी वर्तवली.

पेट्रोलियम पदार्थावर देण्यात येणा-या सवलतीच्या ताण हा सहन करण्यापलिकडे गेल्यामुळे सरकार व पेट्रोलियम कंपन्या हा आर्थिक भार सहन करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. रुपयाच्या अवमुलनामुळे गेल्या दोन महिन्यामध्ये पेट्रोलियम पदार्थावर देण्यात येणारी सवलत ही 20 हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असल्याने जास्त काळ राजकोषीय तूट सहन करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्वत: यासंदर्भातील निर्णय काळजीपूर्वक घेण्याचे आदेश दिले असल्यामुळे काही अन्य पर्यायांचा विचार करण्यात येत आहे.