थेऊरचा चिंतामणी

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात आणि पुण्यापासून अगदी जवळ असलेले थेऊर आणि तिथला चिंतामणी हा अष्टविनायकातील पाचवा गणपती आहे. चिंतामणी याचा अर्थच चितामुक्त करणारा आणि शांती देणारा. मुळामुठेच्या काठी वसलेले हे गांव. त्याचे मूळ नांव स्थावर असे होते आणि अपभ्रंश होऊन थेऊर झाले असेही सांगितले जाते. मुळामुठेचा इथे संथ, शांत आणि खोल डोह आहे त्याला कदंबतीर्थ म्हणतात. खुद्द ब्रह्मदेवाने मनःशांतीसाठी कदंबतीर्थाच्या काठावर असलेल्या कदंब वृक्षाखाली गणेशाची उपासना केली होती असा विश्वास आहे.

Chintamani1

(फोटो सौजन्य – blessingsonthenet.com)

मोरया गोसावी यांचे शिष्य धरणीधर महाराज यांनी हे मंदिर बांधले मात्र त्यानंतर १०० वर्षांनंतर पहिले माधवराव पेशवे यांनी मंदिराला सभामंडप बांधला. कळस तर अलिकडेच बसविण्यात आला असून त्याला सोन्याचा मुलामा आहे. चिंतामणीची अतिशय सुंदर आणि मनमोहक मूर्ती पूर्वाभिमुख आहे. डोळ्यात रत्ने बसविली आहेत. मुख्य द्वाराच्या उत्तरेकडे सभामंडप असून तो लाकडी आहे आणि त्याच्या मध्यावर दगडी कारंजे आहे. मंदिराला ओवर्‍या आहेत. ओवर्‍या म्हणजे भाविकांना ध्यानधारणेसाठी बांधलेले ध्यानकक्ष. मंदिराच्या आवारात छोटेसे शिवमंदिरही आहे.

Chintamani

या मंदिराची कथा अशी सांगतात की अभिजित राजा पुत्रहिन होता.वैशंपायन ऋषींनी राजाला पुत्र व्हावा म्हणून यज्ञ केला आणि त्यातून राजाला पुत्रप्राप्ती झाली. या मुलाचे नाव गणराज. मात्र तो उद्दाम होता. कपिलमुनींच्या आश्रमात तो गेला तेव्हा कपिलांनी त्याचा उत्तम पाहुणचार केला, खाऊपिऊ घातले पण त्याला कपिल ऋषींकडे असलेले चिंतामणी रत्न हवे होते. ऋषींनी रत्न देण्यास नकार दिला तेव्हा त्याने ते बळजबरीने काढून घेतले. दुर्गेने ऋषींना गणेशाची मदत घ्यायला सुचविले आणि गणेशाने युद्ध करून हे रत्न परत मिळवून दिले. मात्र कदंब वृक्षाखाली तप करत असलेल्या कपिल मुनींना तोपर्यंत विरक्ती आली होती म्हणून त्यांनी हेच रत्न गणेशाचा गळ्यात घातले. त्यावरून या गावाला कदंबनगर असेही म्हटले जाते.

पेशव्यांच्या कुळातील पहिले माधवराव पेशवे यांची या चिंतामणी वर नितांत श्रद्धा होती. क्षयाने अवघ्या २७ व्या वर्षीच मृत्यू आलेल्या या पराक्रमी आणि विचारी पेशव्याने अखेरचा श्वास याच मंदिरात घेतला होता. तारीख होती १८ नोव्हेंबर १७७२. माधवरावांची पत्नी रमाबाई यांनी पतीसमवेत सहगमन केले म्हणजेच त्या सती गेल्या. त्यांची सतीसमाधी नदीकाठी आजही पाहता येते. पुणे सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून अवघ्या २२ किमीवर थेऊर गांव आहे.

 

Leave a Comment