उ.प्र.तील दंगल छेडाछेडीतून

लखनौ – उत्तर प्रदेशाच्या मुजफ्फरनगर शहरात झालेली दंगल ही छेडाछेडीसारख्या किरकोळ घटनेतून झाली असल्याचे आता लक्षात यायला लागले आहे. देशात असे प्रकार घडत असतील तर ती चिंतेची बाब म्हणावी लागेल असे काही पत्रकारांनी म्हटले आहे. ही दंगल खरे तर धार्मिक दंगल नाही तर तो दोन जातीतला हिेंसाचार आहे असे समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या म्हणण्यात सारवासारवी असल्याचे दिसत असले तरीही त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे आणि ते नाकारता येत नाही.

एका मुस्लिम तरुणाने जाट समाजातल्या मुलीची छेड काढली आणि या मुलीच्या भावाने त्या मुस्लिम मुलाचा खून केला. ही बातमी कळताच मुस्लिमांनी या दोघा भावांना दगडांनी ठेचून ठार केले. त्यामुुळे जाट समाजाने महापंंचायत भरवली. आधी त्यांनी पंचायत भरवली होती पण सरकारने या पंचायतीतल्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे महापंचायत भरवली आणि तिला अनेक ठिकाणच्या हजारो लोकांनी हजेरी लावली. या महापंचायतीत देश, बहू और गाय को बचाना है, नरेन्द्र मोदी को लाना है | या घोषणांचा परिणाम झाला.

केरळात आणि कर्नाटकात लव जिहाद ही संकल्पना आहे. मुस्लिम तरुण हिंदू मुलींना नादी लावून प्रेमाचे नाटक करतात आणि त्यांना मुस्लिम धर्मात आणतात असा प्रचार संघ परिवाराने केलेला आहे. त्याचाही परिणाम या महापंचायतीवर झाला. याच काळात गायीची हत्या झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या आणि त्यामुळे लोक चिडले. छेडाछेडाच्या प्रकारात समाजातल्या बाईची अब्रु पणाला लागलेली असते आणि तो विषय समाजासाठी फारच संवेदनशील असतो पण पोलीस मात्र त्यांची दखल घेत नाहीत. वेळीच कारवाई करीत नाहीत त्यातून असे प्रकार घडतात. तसाच प्रकार घडला आणि एका छेडछाडीतून ४८ लोकांचे जीव गेले. तसेच २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले.