आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्षपदी थॉमस बाक

अर्जेंटिना – खेळांच्या दुनियेतल्या सर्वात मोठ्या पदावर विराजमान व्हायचे थॉमस बाक यांचे स्वप्न अखेर साकार झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती या ऑलिम्पिक खेळांच्या सर्वोच्च संघटनेच्या अध्यक्षपदी बाक यांची निवड झाली आहे. 59 वर्षांचे बाक हे जर्मन असून, ऑलिम्पिकमध्ये त्यांनी तलवारबाजीत सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाचा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मावळते अध्यक्ष जॅकस रॉग हे तब्बल बारा वर्षांनी आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. रॉग यांच्या पर्याय शोधण्यासाठी झालेल्या निवडणुकीत बाक यांनी आपल्या पाच मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. 1976 साली पश्चिम जर्मनीला सुवर्णपदकाची कमाई करून देणारे गेली अनेक वर्षे ऑलिम्पिक चळवळीशी संबंधित आहेत.

बाक हे पेशाने वकिल असून, 1991 सालापासून ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 22 वर्षांत बाक यांची तीनदा उपाध्यक्षपदी निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कायदेविषयक समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. उत्तेजकविरोधी चळवळीत ते अग्रेसर असून, दोषी खेळाडूंचे दोनऐवजी किमान चार वर्षांसाठी निलंबन करण्यात यावे या मागणीचा ते हिरीरीने पुरस्कार करतात.

Leave a Comment