
वॉशिंग्टन – अवकाशात पाठवल्यानंतर एखाद्या ग्रहावर उतरून संशोधन करणारी अंतराळवाहने(रोव्हर) आता स्वत:चे निर्णय स्वत:च घेणार आहेत. नासाने केलेल्या संशोधनामुळे अशी स्मार्ट अंतराळवाहने अंतराळातील संशोधन अधिक चांगल्या प्रकारे करू शकणार आहेत.
वॉशिंग्टन – अवकाशात पाठवल्यानंतर एखाद्या ग्रहावर उतरून संशोधन करणारी अंतराळवाहने(रोव्हर) आता स्वत:चे निर्णय स्वत:च घेणार आहेत. नासाने केलेल्या संशोधनामुळे अशी स्मार्ट अंतराळवाहने अंतराळातील संशोधन अधिक चांगल्या प्रकारे करू शकणार आहेत.
मंगळ ग्रहासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी नासाने आजवर अनेकदा अंतराळ मोहिमा राबवल्या आहेत. या मोहिमांच्या वेळी नासातर्फे पाठवण्यात आलेल्या अंतराळ यानाने काढलेली छायाचित्रे व जमवलेली माहिती ही जशीच्या तशी नासाच्या मुख्य केंद्राकडे पाठवली जाते. या माहितीवर शास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास करून त्याचे विश्लेषण करण्यात येते. पण नासाने बनवलेले नवीन अत्याधुनिक यान हे ग्रहावर मिळालेल्या माहितीचे स्वत:च विश्लेषण करून त्याच्या आधारे योग्य अंदाज वर्तवू शकणार आहे. त्यामुळे ग्रहावरील मोहिमेसंदर्भात पृथ्वीवरून यानाला देण्यात येणा-या सूचना पोहोचण्यास होणारा विलंब टाळता येणार आहे.
या यानामध्ये दोन लेन्स असलेला अत्याधुनिक असा कॅमेरा बसवण्यात आला असून, त्याचे टेक्श्चर कॅम’ असे नाव असल्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ किरी वागस्टाफ आणि त्यांच्या सहका-यांनी सांगितले. क्युरियॉसिटी आणि अन्य यानांमार्फत मंगळावर संशोधन सुरू आहे. त्यांनी काढलेल्या काही विशिष्ट खडकांच्या छायाचित्रांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी पृथ्वीकडे पाठवण्यात आली आहेत. पण या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागत आहे.
नवीन तंत्रज्ञांनाच्या आधारे बनवण्यात आलेल्या स्मार्ट अंतराळवाहनातील टेक्श्चरकॅमच्या साहाय्याने काढलेल्या थ्रीडी छायाचित्रांचे यानातील संगणकाद्वारे विश्लेषण करण्यात येणार आहे. या छायाचित्रांच्या आधारे माती, खडक आणि आकाशाची माहिती प्रोसेसरच्या साहाय्याने वेगळी करण्यात येणार आहे.
टेक्श्चर कॅमे-याला मंगळावर एखादा विलक्षण खडक सापडला तर त्या खडकाचे उच्च क्षमतेचे छायाचित्र काढून ते पृथ्वीकडे पाठवण्यात येईल. त्यापाठोपाठ त्या खडकासंदर्भातील विश्लेषणही पृथ्वीवर पाठवण्यात येईल. सध्याचे अंतराळ यान हे तंत्रज्ञानाच्या आधारे मिळवत असलेली माहिती ही अभिमानास्पद आहे. पण स्मार्ट’ अंतराळ यान हे अधिक उपयुक्त ठरणार असल्याचे किरी वॅगस्टाफ यांनी सांगितले.