मुंबई – गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या भक्ताना स्टिंग रे नावाचे मासे चावले आहेत. 35 ते 40 भाविकांना हे मासे चावल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यापैकी काही जणांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्टींग रे मासे चावल्याने 40 गणेश भक्त रुग्णालयात
दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटीवर एकच गर्दी केली होती. विसर्जनासाठी पाण्यात शिरलेल्या भक्तांना काही तरी चावल्यासारखे जाणवले. त्यानंतर समुद्रात मासे चावत असल्याची तक्रार घेऊन काही जण पालिका अधिकार्यांपर्यंत पोहचले. सुरुवातीला जवळच्या नायर हॉस्पिटलमध्ये 33 जणांना दाखल करण्यात आले. त्यानंतर जेजे हॉस्पिटलमध्ये 1 तर सेंट जॉर्जेस रुग्णालयात 11 जणांना दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांवर प्राथमिक उपचार करून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यातील कुणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे समजते. मासे चावल्यावर आग होणे, प्रचंड दुखणे असे होत असल्याचे डी विभागाचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांनी सांगितले. ही घटना समजाताच भक्तगणांनी पाण्यात जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
