सिद्धीविनायक ट्रस्ट घेणार महाप्रसादाचे पेटंट

मुंबई – मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट ने मंदिरातर्फे भाविकांना महाप्रसाद म्हणून दिल्या जात असलेल्या लाडूंचे पेटंट घेण्याचा निर्णय घेतला असून जिऑग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुडस अॅक्ट १९९९ खाली हे पेटंट घेतले जाणार आहे. त्यासंबंधी सल्लागाराची नेमणूकही केली गेली आहे आणि सहा महिन्यात या पेटंटखाली नोंदणी केली जाणार आहे असे ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश शिदे यांनी सांगितले.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. दररोज साधारण ४० हजार भाविक येथे दर्शन घेतात तर मंगळवारी हीच संख्या १ ते दीड लाखांवर जाते. सणांच्या दिवसात किवा अंगारकी चतुर्थीला येथे १५ ते ३० लाख इतक्या प्रचंड संख्येने भाविक येतात. मंदिराच्या भटारखान्यात देवाला प्रसाद म्हणून लाडू बनविले जातात आणि नंतर हेच लाडू मंहाप्रसाद म्हणून भाविकांना विकले जातात. १० रूपयांत दोन लाडू बॉक्समधून दिले जातात. मात्र आजकाल मंदिर परिसरातील अनेक हलवाई आणि स्वीट मार्टवाले याच लाडवांची नक्कल करून लाडू विक्री करत आहेत. त्याला आळा बसावा यासाठी लाडवांचे पेटंट घेतले जात आहे.

मंदिरात येणार्याआ भाविकांकडून या महाप्रसादाला मोठी मागणी असते. बेसन, तूप, साखर, तेल वेलदोडा यापासून बनविलेले हे लाडू भाविकांची गर्दी खूप असेल तर कमी पडतात व अशावेळी लाडूंचा काळाबाजार होतो. मंदिराकडून एकदा या लाडवांसाठी पेटंट घेतले गेले की अन्य हलवाई सिद्धीविनायक महाप्रसाद या नावाने लाडू विक्री करू शकणार नाहीत. हलवाई लाडू विकतात मात्र मंदिर ट्रस्ट कडून प्रसाद दिला जातो व त्यामागे भक्तीची भावना असते, तसेच गणेशाचा आशीर्वादही असतो असेही शिदे यांचे म्हणणे आहे. मंदिरातील आचारी दररोज ४० हजार तर गर्दीच्या दिवशी ६५ हजार लाडू बनवितात.

सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी अनेक राजकारणी, सेलिब्रिटी येत असतात. गानकोकीळा लता मंगेशकर, शेहनशहा अमिताभ बच्चन तसेच क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर या गणेशाचे भक्त आहेत.

Leave a Comment