राजनैतिक मार्गाने सीरियाचा प्रश्न सुटावा

वॉशिंग्टन- रासायनिक शस्त्राचा वापर केल्याबद्दल सीरियावर लष्करी कारवाई टाळून राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडवण्यावर आपला भर राहिल, अशी इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केली. मात्र, राजनैतिक मार्गाने यश न आल्यास सीरियावर लष्करी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या ताब्यात रासायनिक शस्त्र देण्याचा रशियाचा प्रस्ताव चांगला आहे. राजनैतिक मार्गाने या प्रश्नवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच लष्कराला हल्ल्याच्या तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असद यांच्यावर दबाव कायम ठेवण्यास सांगितले आहे, असे ओबामा यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.

रशियाच्या रासायनिक शस्त्र आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना देण्याच्या प्रस्तावाला कधी यश मिळेल हे निश्चित सांगता येत नाही. मात्र, बळाचा वापर केल्याशिवाय रासायनिक अस्त्र नष्ट करण्याचा प्रयत्न चांगला आहे, असेही ते म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना आपण रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लॅवरोव यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी आपण चर्चा करीत आहोत, असे ओबामा म्हणाले.