टॉप २०० विद्यापीठांत भारताला नो एंट्री

लंडन – जगातील दर्जेदार उत्तम विद्यापीठांची क्रमवारी करणार्‍या क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०० उत्तम विद्यापीठांची जागतिक यादी केली आहे. मात्र त्यामध्ये एकाही भारतीय विद्यापीठाचा समावेश नाही. या यादीशिवाय जगातल्या ८०० विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांची यादी करण्यात आलेली आहे. त्या ८०० मध्ये मात्र भारतातल्या ११ शिक्षण संस्था समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दिल्ली आयआयटीचा या यादीत २२२ वा क्रमांक आहे.

भारतातली सर्वात उत्तम शिक्षणसंस्था ही जगातली २२२ वी संस्था आहे. यावरून भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या दर्जाचा अंदाज येऊ शकतो. विद्यापीठांच्या यादीतील पहिल्या ३०० क्रमांकात आयआयटी मुंबई (२३३) आणि आयआयटी कानपूर (२९५) यांचा क्रमांक आहे. ३०० ते ४०० या क्रमांकांमध्ये ३१३ वा क्रमांक मद्रास आयआयटीचा असून ३४६ वा क्रमांक खरगपूर आयआयटीचा आहे. म्हणजे पहिल्या ४०० उत्तम शिक्षणसंस्थांत भारतातल्या केवळ ५ संस्थांचा समावेश झालेला आहे आणि विशेष म्हजे या सगळ्या संस्था आयआयटीच्या आहेत.

यापूर्वीच्या अशा क्रमवारीमध्ये या सगळ्या आयआयटी संस्था आलेल्या होत्या मात्र २०१२ च्या पाहणीमध्ये या पाचही संस्थांचे क्रमांक पूर्वीपेक्षा खाली गेलेले आहेत. आयआयटी दिल्लीचा क्रमांक २१२ वरून २२२ पर्यंत खाली आला आहे. अन्य चार आयआयटी संस्थांची परिस्थिती अशीच आहे. या व्यतिरिक्त दिल्ली विद्यापीठ (४४१), मुंबई विद्यापीठ (६०१), पुणे विद्यापीठ (७००) आणि कोलकाता विद्यापीठ (७०१) या विद्यापीठांनी पहिल्या ८०० मध्ये क्रमांक मिळविला आहे.

या क्रमवारीमध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि जपान यांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत. या ८०० विद्यापीठांच्या यादीत अमेरिकेतल्या १४१ विद्यापीठांचा समावेश आहे. ब्रिटन (६९), जर्मनी (४२), फ्रान्स (४०) आणि जपान (३८) याही देशांनी बाजी मारली आहे.