
कॉंलग्रेसचे नेते नेमके काय करायला लागले आहेत हे त्यांनाच कळेनासे झाले आहे. ते जेव्हा वैतागून काही तरी तर्काला सोडून बोलायला लागतात तेव्हा त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागलेला आहे असे समजावे. भाजपाचे नेते नरेन्द्र मोदी यांची राजस्थानात जाहीर सभा झाली. त्यानंतर कॉंग्रेसने राहुल गांधी यांची तिथेच सभा आयोजित केली. नरेन्द्र मोदी यांचा असा पाठलाग करण्याने मोदी काही हैराण होणार नाहीत कारण त्यांच्या आणि राहुल गांधी यांच्या आत्मविश्वासात, व्यक्तिमत्त्वात आणि विशेष म्हणजे वकृत्वात बराच फरक आहे. मोदी यांचा प्रभाव राहुल गांधी मोडून काढतील असा काही राहुल गांधी यांचा करिष्मा नाही. पण कॉंग्रेसच्या नेत्यांना मोदी यांना निष्प्रभ करण्याच्या कल्पनेने एवढे भारून टाकले आहे की त्या नादात आपण मोदी यांची लोकप्रियता कमी करीत नसून उलट ती वाढवत आहोत याचे भान राहिलेले नाही. मोदी हा प्रकारच असा आहे की, त्याच्या बोलण्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करावी तर ती करणाराच हास्यास्पद ठरतो आणि प्रतिक्रिया व्यक्त न करावी तर मोदीच प्रभावी राहतात. मोदी यांच्या पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर होते की नाही याबाबत मोदींचे चाहते शंकित झाले आहेत या नावाबाबत मोदी यांच्यापेक्षा कॉंग्रेसचे नेतेच अधिक चिंतेत पडले आहेत.
भाजपाने कोणाचेे नाव जाहीर करावे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे असे कॉंग्रेसचे नेते म्हणत असतात. त्यांचे हे म्हणणे खरे असेल तर त्यांनी त्या नावाबाबत काही चिंता करण्याचे कारण नाही. पण कॉंग्रेसचे नेते टीका, टिंगल करण्याच्या हेतूने का होईना पण मोदींच्याच नावाचा जप करीत असतात. हा जर भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे तर मग कॉंग्रेसचे नेते, त्या नावाने आपल्याला काही फरक पडत नाही असे म्हणत का होईना पण त्याची चर्चा कशाला करीत असतात ? या चर्चेचा अर्थ असा आहे की मोदींच्या नावाने त्यांना फरक पडत आहे. त्यांनी नाही म्हटले तरी हा फरक पडणार आहे कारण वारंवार केल्या जाणार्या मतदारांच्या चाचण्यांत मोदी हे लोकप्रिय असल्याचे दिसत आहेच पण उत्तरोउत्तर त्यांची लोकप्रियता वाढत आहे. असे असेल तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी, आपल्याला काही फरक पडत नाही असे कितीदाही म्हटले तरी त्यामागचा त्यांचा ढोंगीपणा लपून रहात नाही. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत केलेली अनादर व्यक्त करणारी टिप्पणी ही त्यांना आनंद देऊन गेली असेल पण त्यांच्या या टिंगलीशी जनता सहमत होणार नाही.
त्यांनी आपले उमेदवार राहुल गांधी हेच असतील असे कितीही म्हटले तरी लोकांवर राहुल गांंधी यांचा म्हणावा तसा प्रभाव नाही. त्यांचा प्रभाव हा कॉंग्रेसचा पराभव आहे. उत्तर प्रदेश, पं. बंगाल, गुजरात, तामिळनाडू, बिहार या राज्यांत राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या हातात प्रचाराची धुरा घेतली होती आणि तिथे पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. पण तरीही आपला उमेदवार राहुल गांधी हेच असतील असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. अन्य कोणताही पक्ष कोणत्याही रामू. शामू आणि दामूचे नाव जाहीर करू शकतो. असे शिंदे यांनी म्हटले आहे. मोदी हे भाजपाचे उमेदवार होणार आहेत. त्यांचा उल्लेख असा फालतूमध्ये करावा आणि तोही सुशीलकुमार शिंदे यांनी करावा यात भाजपाचे काही नुकसान नाही पण कॉंग्रेसची मात्र नाचक्की होणार आहे. खरे तर शिंदे यांनी त्या संंबंधातल्या प्रश्नावर काहीच बोलायला नको होते. पण बोलण्यात संयम पाळतील तर ते शिंदे कसले ? त्यांच्या या टिप्पणीची काही तरी प्रतिक्रिया उमटणार हे नक्की आहे. भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग आणि गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे ही या बाबत दोन टोके आहेत. पंतप्रधान तोेंड उघडत नाहीत आणि गृहमंत्री नको तेव्हा तोंेड उघडतात. पंतप्रधानांच्या शांत बसण्याने अनेक प्रश्न निर्माण होतात तर गृहमंत्र्यांच्या तोंेड उघडण्याने अनेक नवे प्रश्न निर्माण होतात.
आता मोदी यांची टिंगल टवाळी करून शिंदे यांनी नव्या समस्यांना तोेंड फोडले आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांना लोकप्रिय करण्याचा वसा हाती घेतला आहे कारण त्यांना मोदी यांचा प्रभाव बेचैन करत आहे. त्यांची लोकप्रियता पंक्चर करण्याचा कॉंग्रेस नेत्यांचा आपापल्या परीने प्रयत्न सुरू आहे. वंजारा यांच्या निवेदनामुळे मोदी अडचणीत येतील अशी आशा त्यांच्या या विरोधकांना लागून राहिली होती पण तसा काही प्रकार घडला नाही. मोदी यांच्या लोकप्रियतेत या प्रकाराने काही फरक पडला नाही. त्यांना निष्प्रभ करण्याचा कॉंग्रेसचा एकेक प्रयत्न उलट त्यांच्या लोकप्रियतेत भर टाकत आहे. असा प्रकार १९७० च्या दशकात झाला होता. त्यावेळी इंदिरा गांधी यांना त्यांच्या विरोधकांनी असेच बदनाम केेले होते. पण या प्रयत्नामुळे प्रसिद्धीचे सारे झोत इंदिरा गांधी यांच्यावर पडलेले असायचे. नेमका असाच प्रकार आता मोदींच्या बाबतीत सुरू आहे. कॉंग्रेसचे नेते शहाणे असतील तर त्यांनी मोदी यांना अनुल्लेखाने मारावे. त्यातच त्यांचे कल्याण आहे पण त्यांना आता जळी स्थळी काष्ठी पाषाणी मोदीच दिसायला लागले आहेत. ते वेळोवेळी मोदींनाच लक्ष्य करायला लागले असल्याने प्रसिद्धीचे बूमरँग त्यांच्यावरच उलटण्याची भीती आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी इतिहासापासून काही तरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.