जगन विरुध्दच्या खटल्यात श्रीनिवासन यांचे नाव

हैदराबाद – आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या विरुध्द सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यामध्ये आरोपी म्हणून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. सीबीआयने मंगळवारी या खटल्याच्या संदर्भातील तिसरे आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र प्रामुख्याने तीन सिमेंट कंपन्यांच्या विरोधात आहे. त्यातील इंडिया सिमेंटस् या कंपनीच्या विरुध्द दाखल झालेल्या आरोपपत्रात प्रतिवादी म्हणून एन. श्रीनिवासन यांच्या नावाचा उल्लेख आहे.

श्रीनिवासन हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीने जगनमोहन रेड्डी यांच्या काही उद्योगात गुंतवणूक केलेली आहे. जगनमोहन रेड्डी यांचे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असताना ही गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्याचा प्रभावाचा विचार करून ही गुंतवणूक करण्यात आली असून या सिमेंट कंपनीच्या जागा आणि परवाने यांच्या संबंधात कंपनीला अनुकूल असे निर्णय सरकारने घ्यावेत यासाठी ही गुंतवणूक करण्यात आली असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

आरोपपत्र दाखल झालेल्या दोन कंपन्या पेन्ना सिमेंटस् आणि भारती सिमेंटस् अशा असून पेन्ना सिमेंटस्चे व्यवस्थापकीय संचालक प्रताप रेड्डी हे आहेत. त्यांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. भारती सिमेंटस्च्या बर्‍याच संचालकांना आरोपी करण्यात आलेले आहे. पेन्ना कंपनीने जगनमोहनच्या उद्योगात ६८ कोटी रुपये गुंतवले आणि त्याच्या बदलात १५०० एकर सरकारी जमीन नाममात्र किंमतीत मिळवली.

इंडिया सिमेंटस् या श्रीनिवासन यांच्या कंपनीने अशाच प्रकारचा व्यवहार केला आहे. या कंपनीचे चार कारखाने आंध्रात आहेत. त्यांनी जगनमोहनच्या साक्षी या वृत्तवाहिनीमध्ये ४० कोटी रुपये गुंतवले आहेत आणि बराच फायदा करून घेतला आहे.