लंडन – अंतराळातील कृष्णविवरांचे कोडे अजूनही शास्त्रज्ञांना उलगडलेले नाही. त्यासाठी मोठया प्रमाणात संशोधन सुरू आहे. अंतराळ संशोधनासाठी जगातील सर्वात मोठी संस्था नासा’तर्फे विविध शोध लावले जात असतात. कृष्णविवराबाबत संशोधन करणार्या नासाच्या न्यूस्टार’ या यानाने पहिल्यांदाच तब्बल 10 मोठया कृष्णविवरांचा शोध लावला आहे.
ही कृष्णविवरे पृथ्वीपासून तब्बल 0.3 ते 11.04 अब्ज प्रकाशवर्षे दूर आहेत. ही कृष्णविवरे शाळेच्या बसच्या आकाराची दिसत आहेत. उच्चशक्तीच्या एक्स रे’ प्रकाशाच्या सहाय्याने यांचा शोध घेण्यात आला. या कृष्णविवरांच्या सभोवताली गॅस व धुळीचे पातळ आवरण आहे. ही कृष्णविवरे अत्यंत दूरच्या आकाशगंगेतील आहेत. इंग्लंडच्या डरहम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि न्यूस्टार प्रकल्पाचे सदस्य डेव्हिड अलेक्झांडर यांनी ही कृष्णविवरे पाहिली. यानंतर या कृष्णविवरांवर अधिक संशोधन सुरू झाले आहे.
यापूर्वी कृष्णविवरांची छायाचित्रे शास्त्रज्ञांकडे होती. मात्र न्यूस्टार’ने पाठवलेली निरीक्षणे अधिक सुस्पष्ट व सखोल आहेत. एक्सरे स्पेक्ट्रम’च्या सहाय्याने केलेल्या निरीक्षणामुळे कृष्णविवरांचे’ गूढ उघडण्यास मदत मिळेल. या एक्स रे’ प्रकाशाच्या सहाय्याने केलेल्या चित्रीकरणाला कॉस्मिक एक्सरेही म्हणतात. न्यू स्टार’ हे यान उच्च दर्जाच्या लहरी पकडू शकते. हे संशोधन द अॅस्ट्रॉलॉजिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहे.