मल्लिका झाली नरेंद्र मोदींवर फिदा

उदयपूर – हॉटबाला म्हणून ओळखल्या जाणार्‍या मल्लिका शेरावतची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी सध्या एकदम खराब होत आहे. किमान एक तरी हिट चित्रपट देण्यासाठी धडपडणार्‍या मल्लिकाच्या नावावर या नादात अनेक फ्लॉप चित्रपट जमा झाले आहेत. या अपयशामुळे धास्तावल्यामुळेच की काय, तिने टीव्हीचा छोटा पडदा जवळ केला असून त्यावर तिने द बॅचलरेट इंडिया : मेरे खयालों की मल्लिका नावाचा एक रिअँलिटी शो स्वीकारला आहे.

या शोमध्ये ती स्वत:साठी परफेक्ट बॅचलरचा शोध घेणार आहे. मात्र या शोकडून मोठय़ा आशा ठेवून असलेल्या मल्लिकाने आपला हा शो तसेच स्वत:बद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढविण्यासाठी सुरुवातीपासूनच बेधडक व खळबळजनक विधाने करण्याचा सपाटा लावला आहे. या शोचे नुकतेच चित्रण सुरू झाले असून त्यासाठी ती उदयपूरला पोहोचली आहे. तिथे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मल्लिकाने आपल्यासाठी देशामध्ये परफेक्ट बॅचलर कुणी असेल तर ते आहेत गुजरातचे मुख्यमंत्री आणि तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले नरेंद्र मोदी हेच आहेत, असे विधान केले आहे.

मोदींचे विचार नवे असून ते विकासाचे आणि क्रियाशील गोष्टींना महत्त्व देतात. ते बुद्धिमान आणि बहादूरही आहेत. त्यामुळेच ते आपल्यासाठी सगळ्य़ाच दृष्टीने योग्य आणि सवरेत्तम आहे, असे तिने सांगितले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या ६२ वर्षीय मोदींचे देशभरात लाखो चाहते आहेत, पण मल्लिकाने त्यांचा मोस्ट परफेक्ट बॅचलर असा उल्लेख करून सगळ्य़ांना हैराण केले आहे. लाईफ ओके वाहिनीवरील या रिअँलिटी शोमध्ये मल्लिकाच्या सोबतीने पॉर्न स्टार सनी लियॉनही दिसणार असून ती मल्लिकाला वर संशोधन करण्यासाठी मदत करणार आहे. मल्लिकाच्या या टिप्पणीवर मोदींनी भलेही प्रतिक्रिया दिलेली नसेल, पण त्यांच्या सर्मथकांनी मात्र ट्विटरवर मल्लिकासाठी ढीगभर कॉमेंट्स केल्या आहेत. काहींनी मल्लिकाच्या या विधानाकडे गंमत म्हणून पाहिले आहे, पण अनेकांनी मात्र तिची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मोदींच्या आधी मल्लिकाने करण जोहरचेही असेच कौतुक केले होते.

Leave a Comment