उपमहापौर निवडणुकीत पुणे महापालिकेत कलमाडी विरुद्ध अजित पवार घोषणायुद्ध

पुणे, – उपमहापौरपदी काँग्रेसचे नगरसेवक बंडू उर्फ सुनिल गायकवाड यांची निवड झाल्यानंतर खासदार सुरेश कलमाडी हे महापालिकेमध्ये आल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच घोषणायुद्ध रंगले. ‘सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी’ या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘एकच वादा अजितदादा’ या घोषणेने उत्तर द्यायला सुरूवात केल्याने वातावरणातील नूरच पालटला. अखेर कलमाडी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसमोरून जाताना ‘जोरजोरात घोषणा द्या’ असे म्हणत बाहेर पडले.

उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बंडू गायकवाड अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. त्यांनी भाजप- शिवसेना युतीच्या उमेदवार माधुरी सहस्त्रबुद्धे यांचा 42 मतांनी पराभव केला. महापौर निवडणुकीप्रमाणेच मनसे तटस्थ राहीली. निवडणूक अधिकारी गणेश पाटील यांनी गायकवाड यांची निवड जाहीर करताच खासदार सुरेश कलमाडी, आमदार रमेश बागवे, विनायक निम्हण, दिप्ती चवधरी, अनिल भोसले, मोहन जोशी, माजी आमदार चंद्रकांत छाजेड सभागृहात दाखल झाले. तोपर्यंत एकच तात्या बंडू तात्या अशा घोषणा देणार्‍या मुंढव्यातील कार्यकर्त्यांनी सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी ही घोषणा द्यायला सुरूवात केली.

कलमाडींच्या नावाने घोषणा सुरू झाल्यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा विजय असो अशा घोषणा देत कलमाडी यांच्या नावाने सुरू असलेल्या घोषणा थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक पुढे सरसावले. डायससमोर थांबून त्यांनी अर्र्र् घुमतंय काय अजित दादांशिवाय पर्याय नाय… एकच वादा अजितदादा अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. कलमाडी हे गायकवाड यांना शुभेच्छा देउन डायसवरून उतरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घोषणा ऐकून ते काहीसे त्रासिक झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसमोर जावून उभे राहीले. परंतू यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी अजितदादांच्या घोषणा सुरूच ठेवल्या. अखेर द्या घोषणा म्हणत कलमाडी हे सभागृहातून बाहेर पडले.

सभागृहामध्ये आवाजी मतदान सुरू असताना सर्वप्रथम बंडू गायकवाड यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. यानंतर युतीच्या उमेदवार माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्यासाठी मतदान पुकारण्यात आले. सहस्त्रबुद्धे यांना मतदान करताना भाजपच्या एका नगरसेवकांने आपले नाव आणि प्रभाग क्रमांक सांगितल्यानंतर बंडू गायकवाड यांचे नाव घेतल्याने सभागृहात हशा पिकला. आपली चूक लक्षात आल्याने या नगरसेवकाने सारवासारव करत सहस्त्रबुद्धे यांचे नाव घेतल्यानंतर सभागृह हास्यात बुडाले.