आमचा धंदा मस्त आहे

गणपती आले की, कॉलनीत चर्चा सुरू होते. यंदाचा गणपती कोण आणणार ? कॉलनीत एक व्यापारी आहेत. त्यांनी यंदा स्वत:हून गणपती आणणार असं जाहीर केलं. चांगला २१०० रुपयांचा गणपती आणला. पूजा झाली. प्रसाद छान होता. सर्वांनाच पोटभर प्रसाद मिळाला. कौतुक झालं. मी तर प्रसाद बघून म्हणालो, यापेक्षा जेवण दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यावर ते म्हणाले, पुढच्या वर्षी ंधंदा अजून छान झाला तर जेवणही देऊ. यंदा धंदा छान झाला होता म्हणून २१०० रुपयांचा गणपती स्वत:हून आणला. धंदा छान चालल्याचा आनंद त्यांना झाला होता हे तर दिसतच होतं. काय होता त्यांचा धंदा ? घरातल्या घरात पाणी लिफ्ट करणार्‍या छोट्या इलेक्ट्रिक मोटारी विकणे आणि दुरुस्त करणे हा त्यांचा धंदा होता. तो यंदा चांगला चालला कारण यंदा गावात छान (!) पाणी टंंचाई होती. म्हणजे गावावर पाणी टंचाईचं संकट कोसळलं की त्यांचा धंदा छान चालणार. पुढच्या वर्षीही धंदा यापेक्षा चांगला चालावा अशी त्यांची देवाकडे प्रार्थना होती. पण या प्रार्थनेचा अर्थ त्यांना कळत नव्हता. त्यांच्या प्रार्थनेचा अर्थ होता, पुढच्या वर्षीही अशीच किंबहुना यापेक्षा वाईट पाणी टंचाई असावी.

आपण धंदा छान चालण्याचा, यश मिळाल्याचा आसाच आनंद व्यक्त करीत असतो पण आपल्या त्या यशात आणि फायद्यात कोणाचा तरी तोटा असतो याचा विचारच करीत नाही. अनेकांचे तर व्यवसायच तसे असतात. कोठे तरी काही तरी वाईट घडले की यांची भरभराट होत असते. पत्रकारांचा प्रकार असाच असतो. एखाद्या दैनिकाच्या पहिल्या पानावर सर्वात मोठी बातमी कोणती करावी ही अशा पत्रकारांची सर्वात मोठी विवंचना असते. एवढ्यात एक फ्लॅश येतो. कोठे तरी रेल्वेचा अपघात होऊन काही लोक ठार झालेले असतात. ही बातमी ऐकून त्याला आनंद होतो कारण त्या बातमीने त्याची बॅनर लाईनची विवंचना मिटलेली असते. आपली विवंचना मिटवणारी ही बातमी किती तरी कुटुंबात अनेक विवंचनांना जन्म देणारी कुवार्ता आहे याचा तो विचारच करीत नाही. काही काही धंदेच असे असतात. मर्तिकाचे सामान विकणारा माणूस गावात कोणी मेलंं आहे का हे पहात असतो कारण कोणी तरी मेलं तरच त्याचा धंदा होणार असतो. कोणाच्या तरी घरात कोणाचे तरी निधन होऊन रडारड चाललेली असते आणि हा मात्र, चला पोराबाळांच्या पोटात चार घास पडतील म्हणून आनंदात असतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण असे अनेक आनंद व्यक्त करीत असतो पण त्याच्या पाठीशी कोणाचे तरी दु:ख असते याची आपल्याला कल्पनाच नसते.

१९७२ च्या दुष्काळातली गोष्ट आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाले होते. खायला काही नाही, कपड्यांची ददात अशा अवस्थेत घरात जे काही असेल ते विकून कशीबशी गुजराण चालली होती. एके दिवशी माझी आई बाजारात गेली असता भांड्याच्या दुकानदाराने तिला एक तांब्याचा हंडा दाखवला. तीन किलो वजनाचा तो हंडा केवळ ४० रुपयाला देत होता. आईला तर आनंदच झाला. ती तो हंडा घरी घेऊन आली आणि तिने तो माझ्या वडलांंना दाखवला. पण तो दाखवताना ती थोडी अंतर्मुख झाली होती. आपल्याला तो स्वस्तात मिळालाय हे खरं पण कोणा बिचार्‍यानं तो आणखी किती स्वस्तात विकलाय कोणास ठावूक. हे म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी आले. तिला शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी माहीत होती म्हणून तिला हे निदान जाणवले तरी पण शेतकरी कसे जगत असतात हे ज्यांना ठावूकच नसते त्यांना तो हंडा मिळाल्यावर लॉटरी लागल्याचा आनंद होणार यात काय शंका ?

श्याम आणि मोनिका लग्न करून नव्या शहरात रहायला गेले. श्यामच्या आई वडिलांना त्यांचे बस्तान त्या नव्या शहरात कसे बसतेय याची काळजी होती. पण हे नवे जोडपे त्या गावात गेले आणि त्यांनी आई वडिलांना आपले सारे छान होत असल्याचे कळवले. ‘गुड न्यूज’ म्हणजे त्यांना अतीशय कमी पैशात मोलकरीण मिळाली होती. त्यांनी ती गुड न्यूज फोनवरून कळवली. तेव्हा आपल्या सुनेला अतीशय कमी पैशात कामाला बाई मिळाली याचा त्यांनाही आनंद झाला. आपल्या सारखी फारच सेन्सिटिव्ह माणसे असतात ती याला गुड न्यूज समजत नाहीत. कारण मुळात आपल्या समाजात, दुसर्‍यांची खरकटी भांंडी घासूनच पोट भरावे लागणारा एक वर्ग आहे ही वस्तुस्थिती त्यातून स्पष्ट झालेली असते. म्हणजे त्यांच्यासाठी असलेली गुड न्यूज ही समाजातल्या कमालीच्या दारिद्य्राच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारी असते. सगळेच काही सेन्सिटिव्ह नसतात. त्यांना ती बातमी आनंदाची वाटत असते. एखादा व्यापारी एखाद्या वर्षी तुरीच्या धंद्यात छान कमाई करतो आणि भरपूर नफा झाल्याच्या आनंदात सत्यनारायणाची पूजा घालतो. त्याला नफा होण्याचे कारण काय असते ? त्याला तूर स्वस्तात मिळालेली असते आणि झालेली दाळ नको इतक्या महागात विकलेली असते. त्याला स्वस्तात तुरी मिळतात तेव्हा त्या तुरी विकणार शेतकरी किती निराश चेहर्‍याने घरी गेला असेल. त्याने तुरी सोबत किती स्वप्ने आणलेली असतील आणि ती पुरी होत नाहीत असे दिसल्यावर त्याच्या कुटुंबात किती वैफल्य पसरले असेल ? याचा विचार कोण करणार?

आपल्या आयुष्याची ही वस्तुस्थितीच आहे. कोठे तरी खड्डा पडल्याशिवाय दुसर्‍या ठिकाणी डोंगर तयार होत नाही. तेव्हा कोणाला तरी काही तरी जास्त मिळते तेव्हा कोणाच्या तरी पदरात निराशा पडलेली असणारच. हा तर निसर्गाचा नियम आहे. हा तर व्यवहार आहे. आपण उगाच कोणाची तरी दया करून हैराण होऊ नये हे बरे. हा तर व्यवहार आहे हे म्हणणे सेन्सिटिव्ह लोकांना पटत नाही. कदाचित त्यांची संवेदना अव्यवहार्य असेल पण कोणालाही असा नफा व्हावा की त्यासाठी कोणालाही तोटा होऊन खड्ड्यात पडण्याची गरज पडता कामा नये. सर्वांनाच आनंंद व्हावा पण त्यासाठी कोणाला तरी दु:खी होण्याची गरज पडता कामा नये. कदाचित हे केवळ स्वप्न आहे असे कोणा व्यवहारी माणसाला वाटेलही पण आपल्या पूर्वजांनी, सर्वेपि सुखिन: संतु, अशी प्रार्थना करताना हेच स्वप्न पाहिले असेल ना !