दाऊद पाकिस्तानातच असल्याचा सुशीलकुमार शिंदेंचा पुनरुच्चार

मुंबई – मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993च्या मुंबईत झालेल्या साखळी स्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमला जेरबंद करण्यासाठी आता अमेरिका आणि भारतानं कंबर कसली आहे. दाउद पाकिस्तानातच असून त्याला पकडण्यासाठी अमेरिकेबरोबर मोहीम राबविणार असल्याचं गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

अब्दुल करीम टुंडा, यासिन भटकळ या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारतीय गुप्तहेर यंत्रणा आणि पोलिसांनी अचुक सापळा रचून नुकतीच अटक केली. या कामगिरीमुळे या यंत्रणेचं कौतुकही झालं आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या. कारण गेल्या अनेक वर्षांपासून हातावर तुरी देणारा दाउद इब्राहीम त्यांच्या रडारवर होता, आजही आहे, पण तो पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. अनेक इशारे आणि समज देऊनही पाकिस्तान दाउदला ताब्यात देत नाही हे लक्षात आल्यावर आता दाउदच्या अटकेसाठी अमेरिकेची मदत घेतली जाणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

भारतातील दहशतवादी कारवायांशी जसा दाउदचा प्रत्यक्ष संबंध आहे. तसाच त्याचा अल कायदा या दहशतवादी संघटनेशीही संबंध आहे. त्यामुळे 2003 पासूनच अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतही तो आहे. आता अमेरिकी यंत्रणा आणि भारतीय गुप्तहेर यंत्रणा एकत्र आल्यानंतर दाऊद लवकरच भारताच्या ताब्यात येईल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे.