नवी दिल्ली – एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या विषयी बरीच चर्चा होत आहे. परंतु त्यांच्या विषयी लोकांना फार कमी माहिती आहे. ती हळू हळू आता उजेडात येत आहे. आसाराम बापू यांचे मूळ नाव आसाराम हरपलानी असे आहे आणि त्यांची मालमत्ता ५ हजार कोटी रुपयांची आहे. जगभरात त्यांचे २ कोटी अनुयायी आहेत. त्यांनी आपल्या आश्रमासाठी बर्याच जमिनी हडपसुध्दा केल्या आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या तीन राज्यांमध्ये त्यांनी बर्याच जमिनी बळाने ताब्यात घेतल्या आहेत आणि त्यांच्यावर या संबंधात काही फिर्यादीसुध्दा दाखल आहे.
आसाराम बापू विषयी बरेच काही…
अहमदाबाद येथे त्यांनी जवळपास १७ एकर जमीन हडप केली असल्याची माहिती २००९ साली गुजरातच्या विधानसभेत देण्यात आली होती. त्यांना अटक होण्यापूर्वी ते राजेशाही थाटात राहत होते. अहमदाबादच्या त्यांच्या आश्रमातून दोन मुले गायब झाली होती. त्यातल्या एका मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाला आसाराम बापूच्या आश्रमात दाखल करण्यासाठी १५ हजार रुपये फी भरली होती. तिची आपल्याला पावतीसुध्दा मिळालेली नाही असे त्याने सांगितले.
एका इंग्रजी दैनिकाने आसाराम बापूंचा इतिहास प्रसिध्द केला आहे. आसाराम बापू हे स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात पाकिस्तानातून पळून आलेले आहेत. ते आपली माहिती कोणालाही देत नसत. अशी माहिती काढण्यास गेलेल्या एका हिंदी दैनिकाच्या महिला पत्रकाराला आसाराम यांच्या आश्रमात कोंडून ठेवण्यात आले होते. आसाराम बापूंचे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यर्ंत झालेले आहे. त्यांचे लग्न लावून देण्यात येणार होते परंतु ते लग्नाच्या आठ दिवस आधी घरातून पळाले. नंतर भटकत राहिले आणि १९६४ साली त्याने संत श्री आसारामजी असे नाव धारण करून लोकांना मूर्ख बनविण्यास सुरूवात केली.
