भुवनेश्वर – भारताची मंगळ मोहीम येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू व्हावी यासाठी भारतीय शास्त्रज्ञांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ही माहिती फिजीकल रिसर्च लॅबोरेटरी या संशोधन संस्थेच्या व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर यु.आर. राव यांनी दिली. भारताच्या या मंगळ मोहिमेविषयी देशातल्याच काही शास्त्रज्ञांनी प्रतिकूल टिप्पणी केली आहे आणि त्यामुळे ही मोहीम वादाचा विषय झाली आहे. ती लांबणीवर टाकली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जायला लागली होती. त्यामुळे ती नोव्हेंबरमध्ये सुरू होणार या बातमीमुळे संबंधितात आनंद व्यक्त केला जात आहे.
भारताची ही मंगळावरची पहिलीच मोहिम आहे आणि ती मनुष्यरहित आहे. या मोहिमेत मंगळावर पाठवला जाणारा उपग्रह हा मंगळाच्या कक्षेत फिरून येईल. तो मंगळाच्या पृष्ठभूमीवर उतरणार नाही. मात्र त्याच्या कक्षेत फिरताना हा उपग्रह मंगळावर जीवसृष्टी आहे का याचा वेध घेईल. या मोहिमेवर ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मंगळावर पाठवला जाणारा हा उपग्रह २९९ दिवस अवकाशात भ्रमण करत राहील आणि २०१४ च्या सप्टेंबरमध्ये मंगळाच्या जवळ जाईल.
मंगळाजवळ जाणारा हा उपग्रह पीएसएलव्ही-एक्सएल या अतिशक्तीशाली रॉकेटच्या साह्याने प्रक्षेपित केला जाईल. भारताच्या अंतराळ मोहिमांचे नियंत्रण करणार्या भारतीय अवकाश संशोधन संघटनेचे अध्यक्ष प्रोफेसर के. राधाकृष्णन यांनी ही माहिती दिली. भारताच्या अंतराळ संशोधनाने बरीच मोठी मजल मारली असल्याचा दावा डॉ. राधाकृष्णन यांनी केला. आपला देश सध्या या क्षेत्रावर बराच खर्च करत आहे. या वर्षी ३ हजार १४८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आपल्या संघटनेत या क्षेत्रात काम करणारे १६ हजार ५०० अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी आहेत अशीही माहिती राधाकृष्णन यांनी दिली.