देशात जातीय हिंसाचारात वाढ

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशात जातीय हिंसाचार वाढत चालल्याबद्दल चिंता व्यक्त केली असून राज्य सरकारांनी जातीय प्रक्षोभ निर्माण करणार्‍यावर लक्ष ठेवावे असे आवाहन केले आहे. सामाजिक ऐक्याला बाधा आणणार्‍या कोणत्याही शक्तींना राज्य सरकारांनी वेळीच रोखावे असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. गतवर्षी देशामध्ये ४१० जातीय दंगे झाले होते. परंतु यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यातच देशाच्या विविध भागात ४५१ जातीय दंगली झाल्या आहेत. अशी धक्कादायक माहिती शिंदे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांमध्ये वाढत चाललेल्या जातीय दंगलींमुळे पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली असून त्यांनी गृहमंत्र्यांना आवश्यक ती पावले उचलण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार गृहमंत्र्यांनी राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकी घेतल्या. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि बिहार या राज्यांमध्ये जातीय दंगे वाढण्याची शक्यता असल्यामुळे विशेष सावधानता बाळगण्याचे आदेश त्यांनी दिले.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अशा प्रकारे समाजात अशांतता निर्माण व्हावी ही गोष्ट चिंतेची असल्यामुळे गृहमंत्र्यांनी ह्या बैठकी बोलावून राज्या राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला. जातीय दंगे होऊ नयेत यासाठी काय करता येईल यावर त्यांनी काही उपाय सांगितले आणि पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. उत्तर प्रदेशाच्या मुझफ्फर जिल्ह्यामध्ये सध्या जातीय दंगल चालू आहे आणि त्यात ९ जणांचे प्राण गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्र्यांचे हे प्रयत्न सुरू झाले आहेत.