लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून रणनीती

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखण्या ची तयारी सुरू केली आहे. आगामी काळात त्यांानी महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे बळकट करण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे सरकारवर जोरदार टीका करताना हिंदुत्वाचा मुद्दाही त्यांच्या प्रचारात अग्रभागी राहणार असे दिसू लागले आहे.

गेल्या निवडणूकीत मुंबईत शिवसेनेला एकही जागा जिंकता न आल्यामुळे गटप्रमुखांच्या मेळाव्याबरोबरच महापालिकेच्या माध्यमातून राबविलेले विविध आरोग्य प्रकल्प लोकांपुढे आणले जात आहेत. कंदिवली येथील शताब्दी रुग्णालयाचे उद्घाटन हा त्याचाच एक भाग आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर लगेचच राज्याच्या दौ-यावर जाऊन उद्धव यांनी शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर महायुतीचा पाया भक्कम करताना मनसेकडे टाळीसाठी हातही पुढे केला. मात्र टाळीला ‘टाटा’चे उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेची बांधणी अधिक भक्कम करून लोकसभेत चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले.

मुंबईत गटप्रमुखांचा विशाल मेळावा घेतानाच महापालिकेच्या माध्यमातून होणारी कामे अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आदेश त्यांनी दिले. अमरावती, नाशिक, शिरूरसह शिवसेनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करून तेथील पक्षबांधणी भक्कम करण्यावर उद्धव यांनी भर दिला आहे. कोकणातील लोकसभा मतदार संघांवर लक्ष केंद्रित करताना मुंबईतील कोकणी माणूसाची नाळ सेनेशीच जोडण्याचे काम सुरू केले आहे.