पुणे, पुण्यात आतासार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या तयारीला आरंभ झाला आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे 122वे वर्ष आहे. सव्वाशे वर्षापूर्वीच्या त्या काळात पुण्यात गणेशोत्सव कसा सुरु झाला, त्याचा इतिहास लेखन व पुढील तीन चार वर्षे त्या इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन उभे करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. त्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाची जी अनेक वैशिष्ठ्ये असणार आहेत त्यात एक लाख महामृदंगाची (ढोल )मिरवणूक हे वैशिष्ठ्य राहणार आहे असे दिसते.
पुण्यातून सुरु झालेला हा गणेशोत्सव आज शेजारचा आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजराथ, गोवा, तामिळनाडू येथेही तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो. पुण्यातील गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीतील रेंगाळलेपणा अन्यत्र कोठेही दिसत नाही. हैदराबादेतील गणेश विसर्जनाची मिरवणूक पुण्याच्या मिरवणुकीपेक्षा किमात दोनपट मोठी असते. म्हणजे चार किमी लांबीची असते. व गणपतीही मोठे असतात. हैदराबादेतील गणपती मूर्तीची उंचीआठ फुटांनीच सुरु होते. लवाजमाही मोठा असतो पण दुपारी बारा वाजता सुरु झालेली मिरवणूक रात्री बारापूर्वी पूर्ण झालेली असते. तेथे जेथे ही मिरवणूक विसर्जन पावते त्या तलावाला विनायक सागर असेच नाव आहे.
तामीळ नाडूमध्ये महाराष्ट्राइतकी गणपतींची संख्या नसते पण अनेक ठिकाणी हा उत्सव चाळीस दिवस असतो. चेन्नईत पाहिलेल्या अनेक गणेशोत्सवात गणपतीच्या मुख्य मूर्तीच्या बाजूला एक शिवाजी महाराज यांची प्रतिमा व दुसर्या बाजूला लोकमान्य टिळक यांची प्रतिमा ठेवलेली असते. गुजराथेत मुख्य उत्सव हा बडोद्याचा असतो. बडोद्याप्रमाणेच इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर येथील सार्वजनिक गणेशोत्सवही मोठा व राजेशाही थाटातील असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाला तसा आरंभ जरी सन 1637 साली म्हणजे शिवाजी महाराज अवघे सात वर्षाचे असताना झाला असला तरी आज जो गणेशोत्सव पुण्यात दिसतो तो जबलपूरवरून आला आहे.
पुण्यातून तो सर्वत्र गेला इंग्रजांच्या काळात त्याचे स्वरुप लोपले होते. 123 वर्षापूर्वी पुण्याचे एक वैद्य खाजगीवाले यांनी ग्वाल्हेरला तेथील शिंदेशाही उत्सव पाहिला व असाच उत्सव पुण्यात सुरु करावा, असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी पुण्यात आल्यावर ही कल्पना श्रीमंत दगडु हलवाई व भाऊ रंगारी यांना सांगितली. त्यानुसार सन 1892मध्ये पहिले तीन गणपती बसविण्यात आले. त्याच्या विसर्जन मिरवणुकीला लोकमान्य टिळकांना बोलावण्यात आले. त्यांनी त्याचे स्वरुप बघितल्यावर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की,‘ हे तर आमचे राष्ट्रीय उत्सव’. आणि दुसर्या वर्षी लोकमान्य टिळक यांनी ते राहात असलेल्या विंचूरकर वाड्यात गणपती बसविला. त्यांनी प्रथम तेथे स्वातंत्र्य चळवळीसाठी काही भाषणाचे कार्यक्रम व राष्ट्रीय बाणा अंगी बाणावा म्हणून काही मनोरंजनाच्या मेळाव्याचे कार्यक्रम ठेवले. तसाच स्वरुपाचे कार्यक्रम दगडू हलवाई, भाऊ रंगारी याना ठेवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी वाई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील मित्रमंडळींना बोलावून घेतले व अशा स्वरुपाचा सार्वजनिक गणपती बसविण्यास संागितले. त्यानंतर त्याचे स्वरुप प्रत्येक शहरापयर्ंत व प्रत्येक गावापर्यंत पोहोचले. सध्या जगात जवळ जवळ प्रत्येक देशात व प्रत्येक शहरात सार्वजनिक गणपती बसतो. त्याचे स्वरुप जेथे जेथे गणपती तेथे तेथे सार्वजनिक गणपती असे झाले आहे.