बीजिंग – तीन लाख सरकारी प्रसारमाध्यमाशी संबंधित चिनी पत्रकारांना मार्क्सवादाचे धडे घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. इंटरनेटच्या वाढत्या प्रभावात मार्क्सवादाची पकड ढिली होऊ नये, यासाठी सरकारने हे उपाय योजल्याचे मानले जाते.
चिनी पत्रकारांना मार्क्सवादाचे प्रशिक्षण घेण्याचे आदेश
जून ते पुढील वर्षी जानेवारीपर्यंत तीन लाख पत्रकारांना मार्क्सवादाचे धडे दिले जातील, असे ग्लोबल टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. चीनमधील आधुनिक प्रसार माध्यमांमध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे. त्यामुळे पत्रकारांनी आणखी जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचे शिन्हुआच्या वृत्तात म्हटले आहे.
इंटरनेट हा सार्वजनिक मतांसाठी युद्धाचा आखाडा तयार झाला आहे. मत मांडताना अनेकदा कायद्याचे उल्लंघन केले जाते, प्रशासनातील त्रुटी उघड करणार्या काही पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी मायक्रोब्लॉग वेबसाइटमधून प्रशासनाविरुद्ध अफवा पसरवल्याचे सरकारचे म्हणणे आहे. प्रशिक्षण कार्यक्रमातून आधुनिक प्रसारमाध्यमात कार्यरत पत्रकारांना कितपत उपयोग होईल याबाबत साशंकता आहे
