चितोडगड – शौर्याचे मूर्तीमंत प्रतीक

राजस्थानातील चितोडगड म्हटले की प्रथम आठवते सौंदर्यखणी राणी पद्मिनी आणि जोहार. जोहार म्हणजे युद्धात पुरूषांचा पराभव होतोय असे दिसले की स्त्रियांनी स्वतःला चिता पेटवून त्यात जाळून घेणे. राजस्थानचा मानबिंदू आणि अभिमान असलेले चितोडगडचे राज्य तीन वेळा आक्रमकांनी उद्धस्त केले म्हणजे तीन वेळा येथे जोहार पेटला आणि येथील शूरवीर रणांगणात शहीद झाले. सर्वप्रथम १३०३ साली अल्लाऊद्दीन खिलजी याने ही नगरी उद्धस्त केली. राणी पद्मनीच्या सौंदर्याची ख्याती ऐकून अल्लाऊद्दीनने तिला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. राणा रतनसिंहाने राणीचे आरशातील प्रतिबिंब अल्लाउद्दीनला दाखविले आणि अल्लाऊद्दीन तिच्या सौंदर्याने पागलच झाला. राणी आपली व्हावी यासाठी त्याने युद्ध केले, राणा रणांगणात पडला पण राणीने आपला सुकुमार देह आपल्या सख्यांसह अग्नीच्या अर्पण करून शीलाचे रक्षण केले अशी इतिहासातील कथा.याच नगरीवर १५३३ साली गुजराथचा सुलतान बहादूरशाह याने हल्ला केला. राणा विक्रमजितचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा राण्यांनी जोहार केला. बुंदीची राजकन्या व राणी कर्णवती हिने आपला छोटा राजपुत्र उदयसिंह याला बुंदीला पाठविले होते.
Chittorgarh
या राजकुमाराला भग्न राज्याचा वारसा मिळाला. मात्र शौर्यापेक्षा समंजसपणाला प्राधान्य देत त्याने मुगल सम्राट अकबरानेच हल्ला केला तेव्हा दोन वीरांवर राज्य सोपवून पळ काढला आणि उदयपूर येथे नव्याने राजधानी वसविली. जयमाल आणि पट्टा या दोन शूरांनी कडाडून प्रतिकार केला पण पराजयच पदरात पडला.अकबराने चितोडगड पूर्ण उद्धस्त केले त्यानंतर ते पुन्हा वसले नाही मात्र राजपूत योद्धयांच्या शौर्याची कथा सांगणारे किल्ले, छत्र्या, महाल आणि विजय स्तंभ हा इतिहास आजही आपल्याला सांगतात.
Chittorgarh1
चितोडगडचा किल्ला अतिशय अवाढव्य व अनेक दरवाजे असलेला आहे. सातव्या शतकात तो मौर्यांनी बांधला. १८० मीटर उंचीच्या टेकडीवर आणि सात एकरात त्याचा पसारा आहे. येथील शिलालेख पराक्रमांच्या गाथा सांगतात तर विजय स्तंभ हा नऊ मजली व ३७ मीटर उंचीचा मनोरा रामायण महाभारतातील कथा, आणि हिंदू देवतांची सुंदर शिल्पे यांनी नटलेला आहे. महाराजा कुंभाने माळवा व गुजराथ येथील मुस्लीम राज्यांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ १४४० साली हा विजयस्तंभ उभारला. कीर्ती स्तंभ हा १२ व्या शतकांत बांधण्यात आलेला २२ मीटर उंचीचा मीनार जैन व्यापार्‍यांनी उभारला असल्याचे सांगितले जाते. राणा कुंभाचा महाल भग्नावस्थेत असला तरी किल्ल्यातील हे सर्वात विशाल स्मारक आहे. येथल्या तळघरातच राणी पद्मिनीने जोहार केल्याचे सांगितले जाते. पद्मिनी महाल तळ्याकाठी असून अतिशय सुंदर आहे.
Chittorgarh2
अन्य पाहण्यासारख्या स्थळांतील एक म्हणजे कुंभ शाम मंदिर. या मंदिराचा संबंध आहे कृष्णभक्त मीराबाई हिच्याशी. युवराज भोजाची पत्नी असलेल्या मीराबाईने कृष्णासाठी विषाचा पेला हसत हसत प्राशन केल्याची कथा आपल्याला माहिती असतेच. आठव्या शतकातील सूर्यमंदिर १४ व्या शतकांत कालिका मंदिर म्हणून प्रसिद्धीस आले. हे सूर्यमंदिर देवी कालिकेस अर्पण करून त्याचेच कालिका मंदिर बनले. चितोडचे रक्षण करणार्‍या जयमाल व पट्टा महाल पाहण्यासारखे. सरकारी संग्रहालयात शिल्पे आहेत. प्रताप पार्क, नेहरू पार्क ही हिरवीगार उद्याने नयनरम्य आहेत. मीराबाई मंदिराचे दर्शनही घ्यायला हवेच. उत्तर भारतीय शिल्प असलेल्या या मंदिराचा गाभारा अतिशय सुंदर आहे. स्तंभांची रांग नजर खिळविणारी. चितोडगड बुंदी रस्त्यावरील बस्सी येथील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे पाहायचीच. शिल्पकाम आणि लाकडी कोरीव काम नजाकतदार आहे. चितोडगडच्या राणा संग बाजार, सदर बाजारात लाकडी खेळणी, कापड, चामड्याच्या वस्तू उत्तम मिळतात. येथे राहण्यासाठी हॉटेल्सची चांगली व्यवस्था आहे तसेच येथे जाण्यासाठी बसेस, रेल्वे सेवाही आहे. सप्टेंबर ते मार्च हा सीझन येथे भेट देण्यासाठीचा उत्तम काळ आहे.

Leave a Comment