गृह कर्ज टप्प्याटप्प्याने देण्याची सूचना

मुंबई – रिझर्व्ह बँकेने गृह कर्ज देणार्‍या सर्व बँकांना एक सूचना केली असून या पुढे घरासाठी दिली जाणारी कर्जे एकदम न देता, घराचे बांधकाम ज्या टप्प्याटप्प्याने होईल त्या टप्प्यानुसार द्यावे असे कळवले आहे. या पद्धतीत गृह कर्ज घेणार्‍या ग्राहकांचे हित असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकांनी घरांची कर्जे देताना इतरही काही नव्या कल्पना राबवाव्यात असेही रिझर्व्ह बँकेने सुचविले आहे. या कर्जांच्या वितरणाच्या प्रचलित पद्धतीत अनेक प्रकारच्या जोखीमा आहेत आणि त्या टाळण्यासाठी काही नव्या सूचना करण्यात येत आहेत.

सध्या कर्ज घेणारांना एका दमात कर्ज दिले जाते. पण कर्ज देताना घराचे बांधकाम कोणत्या थराला आले आहे हे पाहिले जात नाही. काही वेळा कर्ज घेतले जाते पण घर पूर्ण होत नाही. काही घरे तर अनेक वर्षे बांधली जात असतात. त्यांची कर्जेे मात्र घेतलेली असतात. त्यांचे व्याज सुरू होते. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्याची रक्कम बरीच मोठी होते. बिल्डर मंडळी असे पैसे वापरतात.

यासाठी घराच्या कर्जाचे टप्पे करावेत आणि बांधकाम ज्या टप्प्यावर आले असेल त्या टप्प्याची किंमत करून तेवढेच कर्ज वितरित करावे असे बँकेने म्हटले आहे. या पद्धतीत बिल्डरांचा फायदा असतो आणि घर न वापरताच ग्राहक मात्र व्याज देत राहतो. हप्ते फेडत असतो. ही पद्धत बदलणे जरूरीचे असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment