नवी दिल्ली- राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसनंतर आता संपूर्ण पक्षावर लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांतील उमेदवार निवडीत राहुल गांधी स्वत: लक्ष घालणार असून हवे तसे उमेदवार मिळावेत म्हणून ते तिकीट इच्छुकांची एकप्रकारची परीक्षा घेणार आहेत.
आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने ही रंगीत तालीम ठरणार आहे. सत्ताविरोधी लाटेचा सामना करणा-या काँग्रेसच्यादृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यासाठी राहुल गांधी यांनी कंबर कसली असून पक्षातील चांगले उमेदवार हुडकून काढण्यासाठी पाच पानांचा अर्जच तयार केला आहे. या अर्जात इच्छुक उमेदवाराचे संबंधित मतदारसंघाबद्दलचे आकलन, आधीच्या निवडणुकीतील कामगिरी, निवडणुका लढण्याचा अनुभव अशा प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
इच्छुक उमेदवारांना या प्रश्नांची सविस्तर व समाधानकारक उत्तरे द्यावी लागणार आहेत. राहुल गांधी यांच्या या कल्पनेचे काँग्रेस नेत्यांनी समर्थन केले आहे. उमेदवार निवडीच्या या प्रक्रियेमुळे पक्षाला स्वच्छ प्रतिमेचे, गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसलेले योग्य उमेदवार निवडता येतील. तसेच आपापल्या राजकीय गॉडफादरमार्फत होणा-या पक्षांतर्गत लॉबिंगला आळा बसेल, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे.