डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे? – तपास पथकांची संख्या 24 वर

पुणे, -अंध श्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचे गूढ अजूनही कायम आहे. पथकांमागून पथके वाढवत चाललेल्या पोलिसांकडे अद्याप ठोस अशी कोणत्याही प्रकारची माहिती नाही. परिणामी सत्ताधार्‍यांपासून विरोधकांपर्यंत सर्वच पक्षीयांनी टीकेची झोड उठविली असून हा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाण्याची दाट शक्यता का निर्माण झाली आहे.

डॉ. दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास ओंकारेश्‍वर मंदिराच्या समोर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर झाली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेला आता 15 दिवस उलटून गेले आहेत. तपासासाठी सुरुवातीला आठ असलेली पथकांची संख्या आता 23 वर पोहोचली असून कालच आणखी एका पथकाची त्यात भर पडली आहे. निव्वळ शहरातील सीसीटीव्ही फूटेज गोळा करण्याचे काम या पथकाकडे सोपविण्यात आले आहे. राज्यभरातील स्प्लेंडर गाड्या, सुपार्‍या घेऊन हत्या करणारे राज्य आणि परराज्यातील गुन्हेगार, वेगवेगळ्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले कैदी, गुन्हेगार टोळ्या, भोंदू बाबा, बंगाली बाबा, मांत्रिक-तांत्रिक, सनातनी विचारांच्या धार्मिक संघटना अशा शेकडो लोकांकडे तपास करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या हातात अद्याप काहीही नाही, हे सिद्ध झाले आहे.