सनीने ठेवले एकताला ताटकळत

‘जिस्म-२’ हा एकमेव चित्रपट आणि एकच आयटम सॉँग नावावर असलेल्या सनी लियॉनने एवढय़ाशा भांडवलावर सिनेसृष्टीत आपले बर्‍यापैकी स्थान निर्माण केले आहे. ती आता एवढी मोठी हस्ती झाली आहे की, लोकांना आपली प्रतीक्षा करण्यास लावू लागली आहे. हल्लीच घडलेला एक किस्सा मोठा रंजक आहे. पॉर्न चित्रपटांतून बॉलीवूडच्या मायानगरीत पोहोचलेल्या सनी लियॉनची वाट फक्त तिचे चाहते पाहतात असे नाही तर बॉलीवूडमध्ये बडे नाव असलेली एकता कपूरसारखी निर्मातीसुद्धा तिच्या आगमनाकडे डोळे लावून बसते. यावर कदाचित विश्‍वास बसणार नाही, पण हे खरे आहे. कारण सनीचा वेळ मिळत नसल्याने एकताचे एक काम अध्र्यावर लटकून पडले आहे.

एकता कपूरच्या आगामी ‘रागिणी एमएमएस-२’ या चित्रपटांतील एका गाण्याच्या चित्रणासाठी एकताने सनीला अनेकदा निरोप पाठविले आहेत. मात्र सनी अजूनही तिला वेळ देत नाहीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनी लियॉन नायिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण याआधीच उरकले आहे, परंतु त्यातील काही दृश्ये एकताच्या पसंतीस उतरलेली नसल्याने ती नव्याने करण्याची तिची इच्छा आहे. शिवाय त्यात आणखी एक गाणेही समाविष्ट करण्याचा तिचा विचार आहे.

बॉलीवूडचे अन्य कलाकार आपला एक आवाज ऐकून समोर येतात, तशीच सनी धावतपळत येईल, याच भ्रमता एकता वावरत होती, पण सनी चित्रणाचा करार पूर्ण झाल्यानंतर एकही अतिरिक्त तारीख देण्यास तयार नाही. एकताच्या ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई अगेन’ला बॉक्स ऑफिसवर चांगलीच आपटी मिळाल्याने ‘रागिणी एमएमएस-२’ कोणत्याही स्थितीत एकता हिट करायचे आहे. मग त्यासाठी किती का वेळ लागेना तिची तयारी आहे. त्यासाठीच ती सनीला वारंवार संदेश पाठवत आहे. आता त्यास सनी कधी प्रतिसाद देते व एकताची प्रतीक्षा कधी संपविते, हे समजेलच.

Leave a Comment