मोदी सरकारची खरी जागा जेलच – वंजारा

अहमदाबाद – गुजरातमध्ये झालेल्या सोहराबुद्दीन शेख खोट्या चकमकप्रकरणी गेली सात वर्ष कारागृहात शिक्षा भोगत असलेले गुजरातचे माजी पोलिस उपमहानिरिक्षक डी. जी. वंजारा यांनी आयपीएस सेवेचा राजीनामा दिला आहे. वंजारा यांनी मोदी सरकारला दहा पानी राजीनामा पत्र पाठवले असून त्यात मुख्यमंत्री मोदी आणि माजी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. मोदी सरकारची योग्य जागा ही गुजरातची राजधानी गांधीनगर नसून नवी मुंबईतले तळोजा जेल किंवा अहमदाबाद येथील साबरमती जेल आहे, असं या पत्रात म्हटलं आहे. अमित शहा यांनी फक्त राजकीय लाभासाठी गुजरात पोलीसांचा वापर केला होता. त्यांची धडपड फक्त स्वतःला वाचवण्यासाठी सुरु आहे. आमची (जेलमध्ये असलेल्या पोलिसांची) सरकारला अजिबात चिंता नाही. उलट आम्हा पोलीस अधिकार्‍यांना जास्तीत जास्त काळ जेलमध्येच ठेवण्यासाठी मोदी आणि शहा यांच्यात साटेलोटे झाले असल्याचा आरोपही वंजारा यांनी केला आहे. वंजारा यांच्या या पत्राने गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली असून मोदींसाठी नव्याने अडचण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

वंजारा यांना सोहराबुद्दीन शेख, तुलसीराम प्रजापती आणि इशरत जहां यांना खोट्या चकमकीत ठार केल्याप्रकरणी गुजरात सीआयडीने अटक केली होती. विशेष म्हणजे गुजरात पोलीस सेवेत असताना वंजारा हे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे अत्यंत लाडके आणि मर्जितील अधिकारी म्हणून गणले जायचे.

आपल्या राजीनामा पत्रात वंजारा पुढे लिहितात, ममी नरेंद्र मोदींना देवासमान मानायचो. परंतु आता माझा त्यांच्यावर विश्वास उरला नाहीए. ज्या सरकारसाठी आम्ही प्राणाची बाजी लावून काम केले ते सरकार आमचा काहीच विचार करत नाहीए. मोदी सरकार गेली 12 वर्ष खोट्या चकमकीचा मुद्दा सतत जिवंत ठेवून गुजरातमध्ये राजकीय पोळी भाजण्यासाठी त्याचा वापर करीत आहे.फ

या पत्रात वंजारा पुढे म्हणतात की अमित शहा यांना सीबीआयने अटक केल्यानंतर कोर्टात त्यांची बाजू मांडण्यासाठी सरकारने राम जेठमालानी सारखे मातब्बर वकील नेमले होते. परंतु याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍यांना अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. सोहराबुद्दीन शेख हा गुजरात-राजस्थान सीमेवर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला होता. त्यावेळी दोन्ही राज्यात भाजप पक्ष सत्तेवर होता. नंतर सीबीआयच्या चौकशीत ही चकमक खोटी असल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेमुळे देशात राजकारणात वादळ निर्माण केले होते. गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना या गुन्ह्यात अटक झाली होती. तीन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. सीबीआयच्या चौकशीनुसार वंजारा यांनी अहमदाबाद पोलिसांच्या डिटेक्शन ऑफ क्राइम ब्रँच अर्थात डीसीबी शाखेचे नेतृत्व केले होते. या शाखेने 15 जून 2004 रोजी अहमदाबाद शहराच्या सीमेवर इशरत जहां, जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्ले, दोन तथाकथित पाकिस्तानी नागरिक झिशान जौहर आणि अमजद अली राणा यांना चकमकीत ठार केले होते. चकमकीत मारले गेलेल्या या चौघांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ठार करण्याचा कट आखला होता, अशी पोलिसांची माहिती होती. परंतु इशरत जहां हिच्या आईने कोर्टात याचिका दाखल करून या चकमकीचा सखोल तपास करण्याची विनंती केली होती. त्यानंतर गुजरात हायकोर्टने विशेष चौकशी पथक तयार केले स्थापन केले होते. ही चकमक खोटी असल्याचा निष्कर्ष या पथकाने त्यांच्या अहवालात काढला होता.

 

Leave a Comment